सुवर्णवर्णसुंदरं सितैकदंतबन्धुरं !गृहीतपाशकाङ्कुशं वरप्रदाभयप्रदम् !!
चतुर्भुजं त्रिलोचनं भुजङ्गमोपवीतिनं
प्रफुल्लवारिजासनं भजामि सिंधुराननम् !!१!!
सुवर्णवर्णसुंदर- सुवर्ण अर्थात सोने. त्या सोन्याप्रमाणे तेजस्वी रंग असलेले.
सुवर्ण शब्द सु-वर्ण असा वापरल्यास त्याचा अर्थ सुंदर, आकर्षक रंग असा होतो. जगात सर्वाधिक आकर्षक रंग असतो लाल. सर्वप्रथम त्या रंगाकडेच आपले लक्ष जाते. मोरयाचा तो लाल रंग असल्यामुळे ते सुवर्णवर्णसुंदर होत.
सितैकदंतबन्धुर- सित म्हणजे पांढरा. बंधुर म्हणजे मनमोहक. ज्यांचा एक पांढरा दात अत्यंत मनमोहक आहे असे श्री गणेश सितैकदंतबन्धुर होत.
गृहीतपाशकाङ्कुश- भगवान गणेशांना चार हात असतात. यापैकी वरील दोन हात दुष्ट निर्दालनासाठी आहेत. त्यापैकी एका हातात पाश म्हणजे दोरी असते. दुष्ट शक्तींना नियंत्रित ठेवण्यासाठी, बांधून ठेवण्यासाठी हा पाश आहे.
तर दुसऱ्या हातात अंकुश असतो. हत्ती सारख्या बलाढ्य जीवावर नियंत्रण ठेवणारा अंकुश.
वरप्रदाभयप्रद- खालचे दोन हात सज्जन संरक्षणासाठी आहेत. त्यातील एका हातात सर्वश्रेष्ठ वर म्हणजे मोदक असतो. भक्तांना मिळणारा आतला आनंद, स्वानंद हाच सगळ्यात मोठा वर.
तर दुसरा हात अभय प्रदान करतो. सन्मार्गावर, धर्म मार्गावर असणाऱ्या सगळ्यांना भगवान अभय देतात.
चतुर्भुज- भगवान श्रीगणेशांना चार हात आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ ज्यांच्या हातात अर्थात नियंत्रणात असतात त्यांना चतुर्भुज असे म्हणतात.
त्रिलोचन- दैवी शक्तींना तीन नेत्रांचे वर्णन असते. सामान्य दोन डोळे हे भौतिक. तिसरा डोळा आध्यात्मिक दृष्टीचे प्रतीक आहे. अंतर्ज्ञान, दिव्यज्ञान याचे द्योतक आहे तृतीय नेत्र.
भुजंगमोपवीतिन- ज्यांनी गळ्याच शेषनागाला यज्ञोपवीत रूपात धारण केले आहे असे.
प्रफुल्लवारिजासन- वारि म्हणजे पाणी. त्यात जन्माला येते ते वारिज. अर्थात कमळ. अशा फुललेल्या कमळाचे आसन असलेले.
गाणपत्य संप्रदायात स्वानंद नामक गणेशाच्या लोकात तथा साधकाच्या ब्रह्मरंघ्रातील सहस्त्रदल कमलात भगवान गणेशांचे आसन वर्णिले आहे.
त्या सिंधुरानन अर्थात गजमुखी भगवान गणेशांचे मी भजन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply