किरीटहारकुंडलं प्रदीप्तबाहुभूषणं !प्रचंडरत्नकङ्कणं प्रशोभिताङ्घ्रियष्टिकम् !!
प्रभातसूर्यसुन्दराम्बरद्वयप्रधारिणं !
सरत्नहेमनूपुरप्रशोभिताङ्घ्रिपङ्कजम् !!२!!
आपल्या आराध्य देवतेच्या सौंदर्याने विमोहित होणे ही भक्तांची आवडती गोष्ट. त्या देवतेच्या सौंदर्य वर्णनाने स्तोत्र वाङ्मय मोहरून येते. या श्लोकात पूज्यपाद आचार्यश्री भगवान श्री गणेशांच्या विविध अलंकारांचे वर्णन करीत आहेत.
किरीटहारकुंडल – कोणाहीकडे पाहतांना सर्वप्रथम लक्ष चेहऱ्यावर जाते. भगवान श्री गणेश यांच्या मस्तकापासून आचार्य सुरुवात करतात. त्या गज मस्तकावर श्रीं नी रत्नजडित किरीट अर्थात मुकुट धारण केलेला आहे.
संस्कृत भाषेत हार हा शब्द मोत्यांच्या माळां साठी उपयोगात आणतात. श्री मोरयांनी कंठात अशा अनेक माळा धारण केल्या आहेत.
भगवान श्री शूर्पकर्णांनी आपल्या कानात रत्नजडित कुंडले धारण केली आहेत.
प्रदीप्तबाहुभूषण- चेहऱ्यावरून नजर नंतर खांद्यांवर हातांवर जाते. तेथील भूषणांचा विचार करता पुढील वर्णन येते ते भगवंताच्या बाहुभूषणांचे.ते प्रदीप्त अर्थात अत्यंत उज्ज्वल, तेजस्वी आहेत.
प्रचंडरत्नकङ्कण – बाजूबंदानंतर आचार्य श्री मनगटा मध्ये असणाऱ्या कंकणांचे सौंदर्य वर्णित आहेत.
यामध्ये प्रचंडरत्न असा शब्द योजिला आहे. त्याचा एक अर्थ खूप मोठे मोठे रत्न लावलेले आहेत असा होतो. तर दुसरा अर्थ अत्यंत तेजस्वी रत्न लावलेले आहेत असा होतो.
प्रशोभिताङ्घ्रियष्टिक- शेवटी भगवंताच्या चरणकमलावर लक्ष जाते. याकरिता आचार्य श्री प्रशोभित आणि यष्टी अशा दोन बाबींचे वर्णन करतात.
प्रशोभित अर्थात अत्यंत शोभून दिसणारे असा पहिल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट आहे.
तर यष्टि म्हणजे काडी. त्याचा संदर्भ कसा? तर काडी म्हणजे मजबूत गोष्ट. भगवान गणेशांचे चरण अत्यंत मजबूत आहेत हा एक अर्थ. तसेच काडीच्या भरवशावर गुराखी इत्यादी लोक सर्व प्राण्यांना नियंत्रित करतात. त्याप्रमाणे भगवान गणेशांचा चरणकमलाद्वारे सकल जीवांचे संचालन होते हा भाव.
प्रभातसूर्यसुन्दराम्बरद्वयप्रधारिण- अंबर अर्थात वस्त्र. नेसलेले सोवळे आणि पांघरलेले उपरणे म्हणजे अंबरद्वय.
भगवान गणेशांनी परिधान केलेली ही वस्त्रे उगवत्या सूर्याप्रमाणे लालबुंद आहेत. उगवत्या सूर्याच्या प्रसन्नतेचा, आकर्षकतेचा विचार त्यात आहे.
सरत्नहेमनूपुरप्रशोभिताङ्घ्रिपङ्कज- शेवटी वर्णन आहे ते चरणकमलातील नूपुरांचे. रत्नजडित सुवर्ण नूपुर हा शब्दप्रयोग फार महत्त्वाचा आहे. शास्त्रात सोन्याचे दागिने कमरेच्या वर वापरण्याची पद्धत आहे. पायातील नूपुरे कधीही सोन्याची करत नाहीत. अपवाद असतो फक्त राजाचा. सम्राट् किंवा सम्राज्ञी यांनाच सोन्याची नुपुरे परिधान करता येतात. भगवान गणेश सर्व ईश्वर महेश्वरांचे सम्राट असल्याने त्यांची नुपुरे सुवर्णाची आहेत.
अशा विविध भूषणांनी मोरयांचे सौंदर्य अधिकच उजळून निघत आहे.
Leave a Reply