सुवर्णदण्डमण्डितप्रचण्डचारूचामरं !गृहप्रदेन्दुसुन्दरं युगक्षणप्रमोदितम् !!
कवींद्रचित्तरञ्जकं महाविपत्तिभञ्जकं !
षडक्षरस्वरूपिणं भजे गजेंद्ररूपिणम् !! ३!!
सुवर्णदण्डमण्डितप्रचण्डचारूचामर- राजवैभवाचे वर्णन करताना छत्र आणि चामराचे उल्लेख केले जातात. छत्र अर्थात मस्तकावरील ताप हारक उपकरण. त्याचा उल्लेख न करता आचार्य केवळ चामराचा उल्लेख करतात. जणू मोरयाच्या मस्तकावर काही नाहीच आणि त्यांना कशाचाच तापही नाही हे सहज सांगण्याची त्यांची पद्धती आहे.
चामर अर्थात चवरी. दासींनी वारा घालण्यासाठी वापरण्याचे हे उपकरण. मोरया च्या जवळचे हे उपकरण देखील अत्यंत सौंदर्यपूर्ण असे सोन्याने मढवलेले आहे.
गृहप्रदेन्दुसुन्दर- भगवान श्री गणेश भक्तांना चंद्राप्रमाणे सुंदर घर प्रदान करतात. यातील चंद्राप्रमाणे हा उल्लेख मोठा सुंदर आहे. चंद्र जसा आकर्षक, स्वच्छ, प्रसन्न, शीतल, आल्हाददायक तसे घर. अर्थात या सर्व गोष्टी ज्या घरात मिळतात असे घर. समाधान देणारे घर. आनंद देणारे घर.
युगक्षणप्रमोदित- युग म्हणजे चार. कृतयुग ते कलियुग. युगक्षण म्हणजे चार क्षण. अर्थात अत्यल्पकाळ. असे अल्पकाळात प्रसन्न होणारे ते युगक्षणप्रमोदित.
कवींद्रचित्तरञ्जक- कवीं मधील जे श्रेष्ठ ते कवींद्र. त्यांच्या चित्ताला आकर्षित करणाऱ्या मोरयाला कवींद्रचित्तरञ्जक असे म्हणतात.
महाविपत्तिभञ्जक- महान संकटांचा विनाश करणारे. सगळ्यात मोठे संकट आहे हा भवसागर. त्यातून अर्थात जन्ममृत्युच्या चक्रातून मुक्ती देणारे.
षडक्षरस्वरूपिन् – भगवान श्री गणेशांच्या असंख्य मंत्रांपैकी एकाक्षरी महामंत्रानंतरचा अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे षडक्षरी महामंत्र. त्या मंत्राची अधिष्ठात्री देवता असणाऱ्या भगवंतांना म्हणतात षडक्षरस्वरूपिन्.
गजेंद्ररुपिन् – या श्लोकात शेवटी आचार्यश्री गजेंद्ररुपिन् असे संबोधन योजतात. श्रेष्ठ अशा गजराजाचे मुख असणारे सामान्य अर्थ. तर शास्त्रात गज शब्द निर्गुण- निराकारासाठी वापरतात. सर्वच महेश्वर यादृष्टीने गज आहेत. त्यांनाही ब्रह्मच म्हणतात.
त्या सर्व ब्रह्मांचे अधिपती, जे ब्रह्मणस्पती श्री गणेश ते गजेंद्ररुपिन् होत.
अशा श्रीगणेशांचे मी भजन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply