भारतीय संस्कृती व तिचा विस्तार हिमालयाच्या उत्तुंग पर्वत शिखरांच्या रांगेत चीन तुर्कस्तानच्या खोर्यात एका चिमुकल्या जगापासून थोड्याशा अलिप्त असलेल्या अशा अल्चीत कसा झाला ते थोडक्यात पाहू :-
बौद्ध संस्कृती दुरवर पसरलेल्या राष्ट्राजवळील अल्ची येथील बुद्ध मंदिराच्या प्रवेशद्वारावर विराजमान झालेला हा श्री गणेश भक्तांचे मन व दृष्टी खिळवून ठेवतो. तिबेटात गणेशाचे स्थान बुद्धाप्रमाणेच निदर्शनास येत असले तरी अल्ची येथे मात्र ‘श्री गणेशाला’ अग्रपूजेचा मान दिलेला आढळतो.
भक्ताला खिळवून ठेवणारी ही भव्य, आगळी-वेगळी गणेशमूर्ती विराजमान झालेली आहे मृग-चार्मावर एवढेच नव्हे तर त्याच्या दोन्ही बाजूस मृगही आढळतात. हे प्रथम-दर्शनीच आपल्याला नाविण्यपूर्ण वाटते. वक्रतुंड, सरळ सोंड म्हणून जगमान्य श्री गणेश येथे समांतर रेषेत सरळ सोंड असलेला आढळतो. ब्रम्हदेशातील गणेशाप्रमाणे बसलेल्या गणपतीच्या एका हातात सुळा, दुसर्या हातात परशु, एक हात गुडघ्यावर व एका हातात जपमाळ असे रूप दिसते. खांद्यावर घेतलेले उपरणे दोन्ही खांद्यावरून पोटापुढे आलेले दिसते. डोक्यावर पंडिताप्रमाणे घेरा, कपाळावर नाम हे सारे विद्येची देवता म्हणूनच आपणांसमोर दिसते. या गणेशाच्या गळ्यात, हातात, दंडात कोणताही दागिना आढळत नाही. तसेच यज्ञोपवीतही आढळत नाही हे थोडेसे गुढ वाटते. हे एक संशोधनात्मक ठरेल अशा या वेगळ्याच गणेशाचे दर्शन घेताना आपण म्हणू या.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ | निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ||
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply