रणत्क्षुद्रघंटानिनादाभिरामंचलत्तांडवोद्दण्डवत्पद्मतालम् !!
लसत्तुन्दिलाङ्गोपरिव्यालहारं !
गणाधीशमीशानसूनुं तमीडे !!१!!
भगवान गणेशाचे हे स्तोत्र जगद्गुरु शंकराचार्यांनी ज्या वृत्तात रचले त्या नावानेच ते विख्यात झाले आहे. या स्तोत्राचे वृत्त आहे भुजंगप्रयात. भुजंग अर्थात सर्प. तो जात असताना ज्या प्रकारच्या वळणांचा उपयोग करतो तशी वळण घेत जाणारी ही शब्दावली. त्यामुळेच या वृत्ताला भुजंग प्रयात असे म्हणतात.
आपल्याला चिरपरिचित असणारी या वृत्तातील रचना म्हणजे श्री समर्थांचे मनाचे श्लोक.
अशा भुजंगप्रयात वृत्तात केलेल्या या रचनेत जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान गणेशांच्या सुंदर चाली चे वर्णन प्रथम श्लोकात करीत आहेत.
रणत्क्षुद्रघंटानिनादाभिराम- कोणाचेही चालणे दिसण्याच्या आधी ऐकू येते. पायांचा आवाज येतो. त्यातील पैंजणांचा आवाज येतो. त्या पैंजणा मध्ये लावलेल्या छोट्या छोट्या घुंगरांना क्षुद्रघंटा असे म्हणतात. त्या हलत असणाऱ्या घंटांच्या अत्यंत आकर्षक असणाऱ्या निनादाने युक्त अशी चाल असणारे भगवान गणेश ‘रणत्क्षुद्रघंटानिनादाभिराम’ ठरतात.
चलत्तांडवोद्दण्डवत्पद्मताल- उद्दंड म्हणजे ज्यांच्यावर कोणाचाही दंड चालत नाही. कोणाचाही अधिकार चालत नाही. जे आपल्या प्रत्येक कृतीला स्वाधीन असतात. आपल्याच आनंदात ती कृती करतात असे.
अशा आपल्याच आनंदात उचललेल्या पावलांनी चालत येणारे भगवान श्री गणेशांची चरणकमले जणू तांडव नृत्य करीत आहेत असे वाटते.
आनंदाचे सर्वोच्च प्रगटन आहे नृत्य. मोरयाचे सहज चालणे देखील नृत्य वाटते. तितका आनंद त्या चालीत आहे.
लसत्तुन्दिलाङ्गोपरिव्यालहार- आपल्या तुंदिल अर्थात भरगच्च, मांसभरित पोटाच्या भोवताल ज्यांनी व्याल अर्थात सर्पाचे वेस्टन गुंडाळले आहे असे.
गणाधीशमीशानसूनुं तमीडे – या अंतिम ओळीत आचार्य श्री म्हणतात, भगवान शंकरांच्या घरी झालेल्या आणि अवतारात त्यांचे पुत्र झालेल्या, शिवपुत्र गणेशांची मी वंदना करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
भूरि धन्यवादा:| अतीव सुन्दरं स्पष्टीकरणं|???