ध्वनिध्वंसवीणालयोल्लासिवक्त्रं !स्फुरच्छुण्डदण्डोल्लसद्बीजपूरम् !!
गलद्दर्पसौगन्ध्यलोलालिमालं !
गणाधीशमीशानसूनुं तमीडे !!२!!
ध्वनिध्वंसवीणालयोल्लासिवक्त्र- वक्त्र अर्थात मुखारविंद. उल्लासि अर्थात आत्म प्रसन्नतेने फुलून आलेले.
ध्वनिध्वंस अर्थात ध्वनी चा विनाश करणारे.कोणता ध्वनी? तर वीणालय- अर्थात वीणा इ.वाद्यांचा लयबद्ध ध्वनी.
अर्थात त्यांच्या प्रसन्न मुखकमलातून निघालेल्या ध्वनीने वीणा इ. वाद्यातून प्रगट होणार्या लयबद्ध ध्वनीचा विनाश केला आहे. अर्थात ते सर्व ध्वनींचे सौंदर्य मोरया च्या आवाजा समोर विलुप्त होते हा भाव.
स्फुरच्छुण्डदण्डोल्लसद्बीजपूर- भगवान गणेशांचे सगळ्यात सुंदर वैभव आहे त्यांची सोंड. त्या चैतन्यकंद मोरयाची शुंडा सदैव फुरफुरत असते. त्या शुंडा दंडामध्ये मोरयाने बीजपूर नामक फळ धारण केले आहे.
बीजपूरक म्हणजे महाळुंग.हे नाव मोठे सुंदर आहे. बीजपूरक अर्थात बीयांने परिपूर्ण भरलेले. भगवंताला फळ समर्पित करताना त्यात जितक्या अधिक बिया असतील तितके सुयोग्य वर्णिले आहे. त्यामुळेच मोरयाला डाळिंब, महाळुंग, कवठ, सिताफळ इ. फळांना प्राधान्य द्यावे.
बीज शब्दाचा दुसरा अर्थ इच्छा असा पण आहे. आपल्या इच्छाच आपल्या जीवनाचे,जन्माचे बीज आहे. भक्तांच्या अशा सगळ्या इच्छा पूर्ण करणारे मोरयाच्याच हातात आहे हे दाखविण्याची पद्धत आहे बीजपूरक धारण.
गलद्दर्पसौगन्ध्यलोलालिमाल- भगवान गणेशांच्या गज मस्तकावरून सतत मद पाझरत असतो. त्या गळणाऱ्या मदाच्या सुगंधाने आकर्षित झालेल्या भुंग्यांच्या रांगांच्या रांगा जेथे घुटमळत राहतात त्या मोरयाला गलद्दर्पसौगन्ध्यलोलालिमाल असे म्हणतात.
अशा स्वरूपानेयुक्त असणाऱ्या, विविध अवतारांचा स्वरूपात शिवपुत्र असणाऱ्या भगवान श्री गणेशांची मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply