प्रकाशज्जपारक्तरत्नप्रसून-प्रवालप्रभातारुणज्योतिरेकम् !
प्रलम्बोदरं वक्रतुण्डैकदन्तं !
गणाधीशमीशानसूनुं तमीडे !! ३!!
भगवान गणेशांचा आवडता रंग लाल आहे आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे.पण लालच का असे म्हटले तर?
लक्षात घ्या लाल हा थांबण्याचा रंग आहे. लाल दिवा लागला की थांबायचं. जगातील कोणत्याही भाषेतील कोणतेही यंत्र असो. त्याच्यावर लिहिलेल्या सूचना तुम्हाला वाचता येवो अथवा न येवो. ते बंद करण्याचे बटन लालच असते हे नक्की.
लाल हा थांबण्याचा रंग आहे. त्यामुळेच भगवान गणेशांचा रंग लाल आहे. कारण त्यांच्या पाशी आले की थांबायचे आहे. आता पुढे जायला नाहीच काही. हेच सर्वोच्च तत्व. हेच अंतिम तत्त्व. त्यामुळे ते लाल आहेत.
मोरयाचा केवळ रंगच लाल आहे असे नाही तर रक्तगंध, रक्तपुष्प, रक्तवस्त्र इ. त्यांच्या आवडीच्या गोष्टी देखील लाल आहेत.
अशा अनेक लाल गोष्टीचे, तेजस्वी लाल बाबींचे वर्णन करून त्यांच्याहीपेक्षा लाल असे म्हणत आचार्यश्री मोरयाच्या परम आकर्षक रूपांचे वर्णन करीत आहेत.
जपा म्हणजे जास्वंदीचे फूल, रक्तरत्न म्हणजे माणिक नावाचे रत्न,प्रसून शब्दाचा सामान्य अर्थ फुल असा आहे. पण जास्वंदीच्या फुलाचा उल्लेख वर आला आहे त्यामुळे येथे प्रसून अर्थात लाल रंगाचे फूल म्हणजे रक्तकमल किंवा लालगुलाब.
पप्रवाल म्हणजे पोवळे नावाचे रत्न. प्रभातारुण- अर्थात सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी पसरणारी लालिमा. अरुण हा सूर्याचा सारथी. सारथी आधी येतो नंतर रथी. त्यामुळे आधी अरुणोदय नंतर सूर्योदय. त्या अरुणाची किंवा सकाळच्या उगवत्या सूर्याची लालिमा.
ज्योतिरेक- या सर्व लाल पदार्थांची सूची देऊन शेवटी आचार्यश्री हा शब्द वापरतात. या सगळ्यांची ज्योती अर्थात तेज एकत्र केल्यावर निर्माण होईल तशा रंगाचे. किंवा ज्यांच्या रंगा समोर या सर्व गोष्टींचे रंग फिके पडतात असे आहेत भगवान गणेश.
ते लंबोदर आहेत. अर्थात सर्व विश्वाला उदरात सामावणारे आहेत.
ते वक्रतुंड आहेत. अर्थात मायेचा नाश करणारे आहेत.
ते एकदंत आहेत. अर्थात त्याची एकट्याचीच सत्ता आहे.
अशा या शिवसुत रूपात अवतीर्ण होणार्या भगवान गणेशांचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply