विचित्रस्फुरद्रत्नमालाकिरीटं !किरीटोल्लसच्चंद्ररेखाविभूषम् !!
विभूषैकभूषं भवध्वंसहेतुं !
गणाधीशमीशानसूनुं तमीडे !!४!!
विचित्रस्फुरद्रत्नमालाकिरीट- संस्कृत भाषेतील जे शब्द मराठी भाषेत वापरले तर पूर्ण वेगळाच भाव प्रकट होतो त्यापैकी एक शब्द म्हणजे विचित्र.
मराठीत विचित्र हा शब्द अनाकलनीय,अजब, विक्षिप्त, गूढ असा काहीसा नकारात्मक अर्थाने वापरतात.
मात्र संस्कृतमध्ये तो शब्द पूर्ण वेगळ्याच अर्थाने आणि अत्यंत सकारात्मक अर्थाने आहे. चित्र शब्दाचा अर्थ रंगीबेरंगी गोष्ट. आकर्षक गोष्ट. त्याला विशेष या अर्थाने वि उपसर्ग लावला. अर्थात विशेष आकर्षक ते विचित्र. विशेष रंग युक्त ते विचित्र. विशेष सौंदर्यपूर्ण ते विचित्र.
अशा अत्यंत सौंदर्यपूर्ण स्वरूपाच्या विविध रत्नांच्या माळा, विविध रंगांचे तेजस्वी परावर्तन करणाऱ्या रत्नांच्या माळा ज्या श्रीमोरयाच्या किरीट अर्थात मुकुटावर लावलेल्या, सोडलेल्या आहेत त्या श्रीगणेशांना विचित्रस्फुरद्रत्नमालाकिरीट असे म्हणतात.
किरीटोल्लसच्चंद्ररेखाविभूष- भगवान गणेशांच्या त्या मुकुटावर चकाकणारी चंद्रकोर शोभा वृद्धिंगत करीत आहे.
याच कारणाने भगवान गणेशांना भालचंद्र असे म्हणतात. त्यांनी भाळावर अर्थात मस्तकावर चंद्र धारण केला आहे असे. चंद्राप्रमाणे उज्वल, प्रकाशित, शांत, शीतल, मनोहारी ज्यांचे मस्तक ते भालचंद्र.
विभूषैकभूष- विभू म्हणजे परमव्यापक श्रेष्ठ. असे जे अत्यंत विशेष भूषण ते विभूष. असे आभूषण आहे भगवान श्री गणेशांच्या गळ्यातील चिंतामणी रत्न. त्या एकाच आभूषणांने शोभून दिसणारे.
भवध्वंसहेतु – भव अर्थात हा संसार. या संसाराचा लय ज्यांच्या चरणकमलाशी होतो त्या भगवंताला भवध्वंसहेतु असे म्हणतात. ते भगवानच या संसाराच्या निर्मितीचे कारण आहेत आणि विनाशाचे देखील.
अनेक अवतार घेऊन शिवसुत म्हणविल्या जाणाऱ्या त्या भगवान गणाधीशांचे मी वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply