चिदानंदसान्द्राय शान्ताय तुभ्यं !नमो विश्वकर्त्रे च हर्त्रे च तुभ्यम् !!
नमोऽनन्तलीलाय कैवल्यभासे !
नमो विश्वबीज प्रसीदेशसूनो !!८!!
चिदानंदसान्द्र- चित्, आनंद आणि सांद्र असे तीन शब्द आहेत येथे. चित् शब्दाचा अर्थ ज्ञान, चैतन्य. आनंद म्हणजे आनंद. याला पर्यायवाचक शब्दच नाही. या दोन्हींनी सांद्र. सांद्र हा शब्द मोठा सुंदर आहे. त्याचे दोन अर्थ दिले जातात. पहिला अर्थ आहे घन. अर्थात पूर्ण भरलेला, गच्च भरलेला. ज्ञानाने, आनंदाने परिपूर्ण.
सांद्र शब्दाचा दुसरा अर्थ आहे स्निग्ध. मोरया चित्-आनंद घन आहे. पण ही घनता शुष्क नाही. निश्चल नाही. त्याला सांद्र म्हणजे स्निग्धता आहे. ओलावा आहे. स्निग्धतेचा संबंध आहे प्रवाहिततेशी. ते चैतन्य,ते ज्ञान, तो आनंद भगवान गणेश भक्तांपर्यंत प्रवाहित करतात त्यामुळे त्यांना चिदानंदसान्द्र असे म्हणतात.
शान्ताय- भगवान गणेशांचे स्वरूप आहे शांत. माणूस अशांत तेव्हाच होतो जेव्हा एकतर त्याला काही मिळवायचे असते किंवा त्याच्या मनाविरुद्ध काही तरी होते.
भगवंताला काही मिळवायचे नाही आणि त्यांच्या मनाविरुद्ध पानही हलत नाही म्हणून त्यांना शान्त म्हणतात.
नमो विश्वकर्त्रे च हर्त्रे च- श्री गणेश अथर्वशीर्षाच्या त्वमेव केवलं कर्तासि! आणि त्वमेव केवलं हर्तासि ! चे हे कथन. हे मोरया तूच विश्वाचा कर्ता,धर्ता आणि हर्ता आहेस.
नमोऽनन्तलीलाय- भगवान श्रीगणेशांच्या लीलांना अंतपार नाही.
कैवल्यभास- येथे भास शब्दाचा अर्थ जाणीव. तर कैवल्य शब्दाचा अर्थ आहे ज्ञानाने प्राप्त होणारी अवस्था. त्या कैवल्य दशेतच ज्यांची जाणीव होत असते ते कैवल्यभास.
विश्वबीज- हे मोरया आपणच या संपूर्ण ब्रम्हांडाचे मूल बीजतत्व आहात.
हे ईशसूनु अर्थात शिवसुता आपणास वंदन असो.आपण मला प्रसीद अर्थात प्रसन्न व्हावे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply