इमं सुस्तवं प्रातरुत्थाय भक्त्या !पठेद्यस्तु मर्त्यो लभेत्सर्वकामान् !!
गणेशप्रसादेन सिध्यन्ति वाचो !
गणेशे विभौ दुर्लभं किं प्रसन्ने !!९!!
या अंतिम श्लोकात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शिरस्त्याप्रमाणे फलश्रुती सादर करीत आहेत. अर्थात फलश्रुतीचे स्वरूप ‘रोचनार्था फलश्रुति:! ‘ अर्थात सामान्य वाचकांना प्रोत्साहित करण्यासाठी तिचा उपयोग असल्याने आचार्य श्री एकाच श्लोकात हा विषय मांडत आहेत.
प्रथम चरणात आचार्य श्री हे स्तोत्र केव्हा? आणि कसे ? म्हणावे ते सांगत आहेत.
हे स्तोत्र सकाळी म्हणायचे आहे. इथे सकाळ हा शब्द केवळ काळ या अर्थानेच नाही. रात्र शब्दाचा अर्थ आहे अंध:कार. निद्रा. अज्ञान. त्यातून बाहेर पडणे हीच जागृती. ती जागृती जे घडवून आणतात ते चरण आहेत मोरयाचे.
भगवंता शिवाय आणि कशानेही सुख वाटणे हेच अज्ञान. ते गेल्यावर येणारी अनन्यशरणता हीच जागृती. त्यानंतर मनात येणारे विशुद्ध भाव हीच भक्ती. जागृतीच्या सकाळी या अनन्यशरण भक्तीने युक्त होऊन या सुंदर स्तोत्राचे गायन करावे, असे आचार्य श्री सांगत आहेत.
लभेत्सर्वकामान्- अशा रीतीने जो मर्त्य म्हणजे मानव या स्तोत्राचे पठण करील त्याला काय मिळेल? या प्रश्नाचे आचार्यांनी एकाच शब्दात दिलेले उत्तर आहे लभेत्सर्वकामान् ! अर्थात जे जे मनात असेल ते सर्व प्राप्त होईल.
बाह्य जगाबाबत तर हे घडेलच पण खरा विषय आहे जे मनात असेल म्हणजे स्वतः भगवंताची प्राप्ती. कारण वर सांगितलेल्या अनन्यशरण भक्ताच्या मनात तेच असतात.
गणेशप्रसादेन सिध्यन्ति वाचो- आचार्य श्री येथे एका वेगळ्याच फळाचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात या स्तोत्राच्या पठणाने श्रीगणेश कृपेने वाचासिद्धी प्राप्त होते. असा भक्त जे बोलतो ते खरे होते. पुन्हा विषय केवळ व्यवहाराचा नाही. असा भक्त केवळ भगवंताचे नाव घेत राहतो. त्याला त्याआधारे नामीची प्राप्ती होते. भगवंताची प्राप्ती होते.
गणेशे विभौ दुर्लभं किं प्रसन्ने ! हे अंतिम चरण किती गोड आहे? एकदा मोरया प्रसन्न झाला की मग जगात दुर्लभ काय आहे?
श्री मुदगल पुराण यासाठी वर्णन करते, ‘ ‘किं दुर्लभं विघ्नहरे प्रसन्ने !’
जय गजानन.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply