भाद्रपद शुद्ध चतुर्थी रोजी गणेश चतुर्थी व्रत केले जाते. हे व्रत, उत्सव जवळपास संपूर्ण भारतात करतात. याला वरद चतुर्थी असेही नांव आहे.
या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने किंवा पार्थिव गणपति असे म्हणून पूजा करतात.
या दिवशी चंद्रदर्शन घेऊ नये असे शास्त्रात सांगितले आहे. चंद्रदर्शन झाल्यास चोरीचा आळ येतो. भगवान श्रीकृष्णांना असे चंद्रदर्शन घडले व त्यांचेवर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला. एखाद्याला चंद्रदर्शन घडले तर पुढील श्लोक म्हणावा असे तिथीतत्वात सांगितले आहे.
“सिंह प्रसेनमवधीत् सिंहो जांबवता हत: ।
सुकुमारक मा रोदिस्तव ह्येष: स्यमन्तक: ।।”
याचा अर्थ सिंहाने प्रसेनाला मारले, सिंहाने जांबवताला मारले, सुकुमारा रडू नको, हा स्यमंतक मणी तुझाच आहे. हा श्लोक म्हणत असताना पाणी प्यावे व स्यमंतक मण्याची कहाणी ऐकावी.
चंद्रदर्शन न करण्याविषयी दुसरी कथा आहे. गणपती उंदरावर बसून जात असता चंद्राने पाहिले व त्याला हसू आले. तेव्हा गणपतीने चंद्राला शाप दिला. “आजपासून कोणीही तुझे मुखावलोकन करणार नाही.” नंतर चंद्राने करुणा भाकली तेव्हा उ:शाप दिला की “फक्त गणेश चतुर्थीचे दिवशी तुला कोणी पाहणार नाही.”
महाराष्ट्रात हा उत्सव फारच उत्साहात साजरा केला जातो. घरा-घरातून गणेशमूर्ती पूजिल्या जातात. दीड दिवसापासून दहा दिवसांपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो.
विद्याधर करंदीकर
Leave a Reply