अकिंचनार्तिमार्जनं चिरंतनोक्तिभाजनं !पुरारिपूर्वनंदनं सुरारिगर्वचर्वणम् !!
प्रपञ्चनाशभीषणं धनंजयादिभूषणं !
कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् !!४!!
अकिंचनार्तिमार्जन- किंचन म्हणजे थोडेसे, अल्प, किंचित. ते देखील त्यांच्याजवळ नाही ते अकिंचन. व्यवहारातील सुखाची, आनंदाची थोडीही साधने ज्यांच्याजवळ नाहीत ते अकिंचन. अध्यात्मिक भूमिकेतून ज्यांच्याजवळ साधना, उपासना नाही ते अकिंचन. त्यांनीदेखील प्रार्थना केल्यावर त्यांची आर्तता म्हणजे दुःख दूर करतात ते अकिंचनार्तिमार्जन.
चिरंतनोक्तिभाजन- चिरंतन अर्थात शाश्वत, अक्षय, अविनाशी. उक्ती अर्थात वचन. जे शाश्वत वचन, चिरंतन कथन ते चिरंतनोक्ती.
अशी आहेत वेद,शास्त्र उपनिषदे. त्यात संगीतलेले ज्ञान शाश्वत आहे. त्यांचे कथन चिरंतन आहे.
अशा वेद,शास्त्रांचे भाजन अर्थात वर्ण्य विषय, सांगण्याचा मूळ सिद्धांत ते चिरंतनोक्तिभाजन.
पुरारिपूर्वनंदन- पुर म्हणजे नगर. ज्याच्याजवळ तीन पुर होते तो त्रिपुर. त्या त्रिपुरासुराचे शत्रू म्हणजे भगवान शंकर हे पुरारी.
त्यांचे पूर्वनंदन अर्थात मोठे चिरंजीव. श्रेष्ठ चिरंजीव. हा सामान्य अर्थ. तर भगवान शंकरांच्या देखील पूर्वी विद्यमान असणारे आनंदतत्व हा अधिक सुंदर अर्थ. हे आनंद तत्व, हा आत्माच पुत्र रुपात प्रगट होतो असे शास्त्र सांगते.
सुरारिगर्वचर्वण- सुर म्हणजे देवता. त्यांचे अरी म्हणजे शत्रू अर्थात दैत्य. त्या सगळ्या राक्षसांच्या गर्वाचा जे चावून चोथा करतात, अर्थात तो गर्व पूर्णपणे नष्ट करून टाकतात ते सुरारिगर्वचर्वण.
प्रपञ्चनाशभीषण- जे या भीषण प्रपंचाचा विनाश करतात किंवा जे या प्रपंचातील भीषणत्वाचा विनाश करतात त्यांना प्रपञ्चनाशभीषण असे म्हणतात.
धनंजयादिभूषण- आपल्या शरीरात प्राण, अपान इत्यादी मुख्य वायू सह नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय असे पाच उपप्राण असतात. यापैकी धनंजय हा मस्तकात रहात असून तो कधीही शरीर सोडत नाही. त्या धनंजयाला भूषण करणारे ते धनंजयादिभूषण. अर्थात यांच्या कृपेने या शरीरात चैतन्य तत्व शेवटपर्यंत स्थिर राहते ते धनंजयादिभूषण.
कपोलदानवारण- हा शब्द गजमस्तकाशी संबंधित आहे. हत्तीच्या सोंडेवर समोर जे अलंकृत कापड सोडतात त्याला कपोलदान असे म्हणतात. ते धारण केलेला वारण म्हणजे हत्ती.
असा सजवलेला हत्ती हे सर्वोच्च समृद्धीचे प्रतीक आहे.भगवान गणेश अशा सर्वोच्च वैभवाने अलंकृत असल्याने त्यांचे नाव आहे कपोलदानवारण.
पुराणवारण- वारण शब्दाचा आणखी एक अर्थ आहे अदृश्य. पुराण वारण याचा अर्थ पुराणांमध्ये अदृष्य स्वरूपात असणारे. कोणत्याही ग्रंथात शब्द हे दृश्य असतात तर अर्थ अदृश्य असतात. सगळ्या पुराणांचा अंतिम अर्थ, अंतिम कथनीयतत्व, अंतिम सिद्धांत ते पुराणवारण.
अशा भगवान गणेशांची मी भजन करतो, आराधना करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply