नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजं !अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तराय कृन्तनम् !!
हृदन्तरे निरंतरं वसंतमेव योगिनां !
तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि संततम् !! ५!!
नितान्तकान्तदन्तकान्ती- भगवान श्री गणेशांचे मुख हे प्रतीक रूपात हत्ती समान आहे. हत्तीच्या मुखाचे आगळे सौंदर्य आहे त्याचे दात. सामान्य हत्तीचे ते दात मळलेले असतात. तुटलेले असतात. त्यामुळे त्याची कांती लोप पावलेली असते.
मात्र मोरयाचे वैभव आहे या दातांचे अत्यंत सौंदर्यपूर्णत्व. या दातांची कांती अर्थात तेज अतीव आकर्षक आहे.
हे दात एकतर हत्तींच्या आपापसातील भांडणामुळे खराब होतात किंवा त्याला कामाला जुंपल्यामुळे खराब होतात. भगवान श्री गणेशाच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी शक्य नाहीत.ते एकमेवाद्वितीय असल्याने कोणाशी भांडणाचा प्रश्न नाही. तसेच त्यांना कोणी कामाला जुंपण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पर्यायाने त्यांच्या दाताची कांती खराब होतच नाही.
त्यामुळे त्यांना ‘नितान्त-कान्त-दन्तकान्ती ‘असे म्हणतात.
अन्तकान्तकात्मज- अंत म्हणजे शेवट. जो शेवट करतो तो अंतक. अर्थात श्री यमराज. त्या यमाचा देखील जे अंत करतात ते अन्तकान्तक. अर्थात भगवान शंकर. त्या शंकरांच्या घरी भगवान श्री गणेश, मयुरेश्वर, गजानन, पुष्टीपती इ. विविध अवतारांच्या वेळी पुत्र रूपात अवतीर्ण होतात. त्यामुळे त्यांना अन्तकान्तकात्मज असे संबोधले जाते.
अचिंत्यरूप- भगवान गणेशांचे रूप आपल्यापेक्षा पूर्णतः भिन्न आहे. आपले मुख सगुण-साकार म्हणजे जग स्वरूप आहे. तर मोरयाचे मुख निर्गुण-निराकार अर्थात गज स्वरूप आहे. त्यामुळे आपल्या सामान्य चिंतनाच्या पलीकडे असणारे भगवान गणेश अचिंत्यरूप आहेत.
अंतहीन- भगवान गणेश जसे अनादी आहेत तसेच ते अनंत देखील आहेत. त्यांचा अंत संभव नाही.
अन्तरायकृन्तन- अंतराय म्हणजे अडचणी, संकटे,अडथळे. कृंतन अर्थात कुरतडून टाकणे. एखादी गोष्ट कुरतडून टाकली की ती पुन्हा जोडता येतच नाही. तसेच ज्यांच्या कृपेने भक्तांच्या जीवनातून दूर झालेले संकट कधीच परत येत नाही ते अन्तरायकृन्तन.
हृदन्तरे निरंतरं वसंतमेव योगिनाम् – अर्थात जे सदैव योग्यांच्या हृदयात निवास करतात. अर्थात योगी हृदयात सदैव ज्यांचे ध्यान करतात असे.
एकदंत- ज्यांची एकट्याचीच सत्ता संपूर्ण जगावर चालते त्यांना एकदंत असे म्हणतात.
जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात की मी त्या एकदंतांचे सदैव चिंतन करीत असतो. त्यांच्या त्या दिव्यशक्तित्वाचे चिंतन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply