महागणेशपञ्चरत्नमादरेण योऽन्वहम् !प्रगायति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् !!
अरोगतामदोषतां सुसाहितीं सुपुत्रतां !
समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोऽचिरात् !!६!!
भगवान श्री गणेश यांचे वैभव सांगणाऱ्या या श्री गणेशपंचरत्न स्तोत्राच्या शेवटी भगवान जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य महाराज हा फलश्रुती स्वरूप श्लोक रचित आहेत.
यात आरंभीच्या दोन ओळीमध्ये हे स्तोत्र कसे म्हणावे? याचे वर्णन आहे. तर पुढच्या दोन ओळींमध्ये या स्तोत्राने काय मिळते? ते वर्णिले आहे.
कसे म्हणावे हे स्तोत्र? पूज्यपाद आचार्य म्हणतात –
अन्वहम् – अर्थात याचे चिंतन रोज असले पाहिजे. कधीतरी, वेळ मिळेल तेव्हा, असे नाही.
प्रगायति- स्तोत्राचे गायन हवे. गायन हे आनंदातच शक्य असते. अर्थात स्तोत्र पाठ हा प्रसन्नपणे, आनंदात करण्याची गोष्ट आहे. काही मागण्यासाठी नाहीतर नो मागता जे मिळाले त्याच्या धन्यवादासाठी स्तोत्रगायन हवे.
प्रभातके- सकाळच्या मंगलमय वेळी मंगलमूर्तीचे स्मरण असावे असे आचार्य विशेषत्वाने वर्णन करीत आहेत.
हृदिस्मरन् गणेश्वरम् -हे गायन हृदयात भगवान गणेशांचे चिंतन करीत केले जावे. मनात भलतेच विचार करीत केवळ तोंडाने स्तोत्र म्हणणे निरर्थक आहे हा त्यातील भाव.
या स्तोत्राच्या पठणाने काय प्राप्त होईल? याची सूची देताना आचार्य म्हणतात-
अरोगता-अर्थात साधकाला आरोग्यप्राप्ती होते. आरोग्य हेच सर्व सुखाचे अधिष्ठान आहे. ते नसेल तर अन्य सर्व साधने निरर्थक आहेत.
अदोषता- शरीर निरोगी होते तर मन निर्दोष होते.
सुसाहिती- अर्थातच सर्व सुयोग्य साधनांची प्राप्ती होते.
सुपुत्रता- चांगली संतती हा सगळ्यात सुंदर आनंद आहे. श्रीगणेश कृपेने पुत्र पौत्र प्राप्त होतात. अर्थात सर्व वैभव वंशपरंपरेने चालत राहते.
अष्टभूती- यश, सत्ता, संपत्ती, शांती, समाधान, आरोग्य आणि ज्ञान या आठ गोष्टींना अष्टभूती म्हणजे आठ प्रकारचे वैभव असे म्हणतात.
भगवान श्री गणेशांच्या कृपेने या सर्व गोष्टी प्राप्त होतात.
सोऽचिरात् – अर्थात अल्पावधीत. वर्षानुवर्ष किंवा जन्मोजन्म हे करत राहण्याची आवश्यकता नाही.
भगवान श्री गणेशाच्या कृपेने या सर्व गोष्टी लवकरात लवकर मिळतात ही जगद्गुरु आदि शंकराचार्यांची उक्ती म्हणजे सुनिश्चितेची ग्वाही आहे.
जय गजानन.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply