MENU
नवीन लेखन...

श्रीकामाक्षीसुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग १

श्रीकामाक्षीसुप्रभातम्

मराठी अर्थासह – भाग १

कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती यांच्या आदेशानुसार श्री लक्ष्मीकांत शर्मा यांनी इंद्रवज्रा व उपेन्द्रवज्रा वृत्तात रचलेले हे स्तोत्र अशा इतर स्तोत्रांपेक्षा थोडे वेगळे आहे. कामाक्षी देवीला निद्रितावस्था त्यागण्याची विनंती करतानाच ते जगन्मातेला शुभ प्रभात चिंतण्याऐवजी, `आम्हा भक्तांची सकाळ शुभप्रद करअशी विनंती करते.

कामाक्षि देव्यंब तवार्द्रदृष्ट्या
मूकः स्वयं मुक्तकविर्यथाऽसीत् ।
तथा कुरु त्वं परमेशजाये
त्वत्पादमूले प्रणतं दयार्द्रे ॥
उत्तिष्ठोत्तिष्ठ वरदे उत्तिष्ठ जगदीश्वरि ।
उत्तिष्ठ जगदाधारे त्रैलोक्यं मङ्गलं कुरु ॥ ०१

मराठी–  हे कामाक्षी देवी माते, तुझ्या आर्द्र नजरेने स्वतः वाचारहित असलेला कवीही मुक्त झाला. हे शंकराच्या भार्ये तुझ्या पायाशी शरण आलेल्यांनाही तू तसेच (मुक्त) कर. हे,जगाचा आधारभूत असलेल्या वरदायिनी, विश्वाच्या देवते ऊठ,ऊठ. तिन्ही जगांना पावन कर.

कामाक्षि देवी तव स्निग्ध दृष्टी
निःशब्द देई कवीस मुक्ती ।
तसे करी तू शरणागतांना
गिरीशभार्ये तुझिया पदांना || ०१
ऊठ गे ऊठ वरदे ऊठ गे जगदेवते
आधार जगताचा तू, त्रिलोकां पावनत्व दे ॥ ०१


शृणोषि कच्चिद् ध्वनिरुत्थितोऽयम्
मृदङ्गभेरीपटहानकानाम् 
वेदध्वनिं शिक्षितभूसुराणाम्
शृणोषि भद्रे कुरु सुप्रभातम् ॥ ०२

मराठी– मृदंग, डंका,पडघम यांचा आवाज कुठून तरी उठला आहे. वेदपंडितांचा श्रुतिगायनाचा आवाज ऐक. हे कल्याणी (सर्वांची) सकाळ शुभदायी कर.

डंका तसा ढोल पखावजाचा
कानी ध्वनी हा उठतोय साचा |
ऐक श्रुतींचा ध्वनी वैदिकांचा
शुभे दिनारंभ करी सुखाचा ॥ ०२


शृणोषि भद्रे ननु शङ्ख घोषम्
वैतालिकानां मधुरं च गानम् ।
शृणोषि मातः पिककुक्कुटानाम्
ध्वनिं प्रभाते कुरु सुप्रभातम् ॥ ०३

मराठी– हे शुभदे माते, तुला खरोखर शंखांचा ध्वनि, भाटांचे गोड गाणे, कोकीळ, कोंबडे यांचे आरवणे ऐकू येत आहे. तू आमची सकाळ मंगल कर.

शंखध्वनी ये तुज ऐकु कानी
गाती तसे शाहिर गोड गाणी ।
पुकार ये कोकिळ कोंबड्यांचा
शुभे दिनारंभ करी सुखाचा ॥ ०३


मातर्निरीक्ष्य वदनं भगवान् शशाङ्को
लज्जान्वितः स्वयमहो निलयं प्रविष्टः ।
द्रष्टुं त्वदीय वदनं भगवान् दिनेशो
ह्यायाति देवि सदनं कुरु सुप्रभातम् ॥ ०४॥

मराठी– हे माते (तुझे सुंदर)मुख बघितल्यावर स्वतःची लाज वाटलेला दिव्य चंद्र आपण होऊन आपल्या घरात गेला. (तर) तुझे मुख अवलोकन करण्यासाठी दिव्य सूर्यच (स्वतः तुझ्या) घराकडे येत आहे. हे देवी, तू आमची सकाळ मंगल कर.

दैवी शशीस मुख पाहुन लाज वाटे
तेणे घरात शिरला लपण्यास माते ।
दैवी रवी तव गृही मुखदर्शनाला
आला स्वतः, सुखद दे दिन या जगाला ॥ ०४


पश्याम्ब केचिद् धृतपूर्णकुम्भाः
केचिद् दयार्द्रे धृतपुष्पमालाः ।
काचित् शुभाङ्गयो ननु वाद्यहस्ताः
तिष्ठन्ति तेषां कुरु सुप्रभातम् ॥ ०५॥

मराठी– हे कारुण्याने परिपूर्ण माते, बघ. काहीजण (पाण्याने) भरलेले घडे घेऊन,काही हातात फुलांच्या माळा घेऊन, तर काही स्त्रिया हाती वाद्ये घेऊन उभ्या आहेत. त्यांची सकाळ तू आनंदमय कर.

हाती कुणी घे जलयुक्त हंडे
हाती कुणाच्या फुलहार वेढे ।
हाती उभ्या घेउन वाद्य नारी
त्यांच्या सकाळी भर मोद भारी ॥ ०५


भेरीमृदङ्गपणवानकवाद्यहस्ताः
स्तोतुं महेशदयिते स्तुतिपाठकास्त्वाम् ।
तिष्ठन्ति देवि समयं तव काङ्क्षमाणाः
ह्युत्तिष्ठ दिव्यशयनात् कुरु सुप्रभातम् ॥ ०६॥

मराठी– हे शंकराच्या प्रियतमे, तुझी प्रशंसा करण्यासाठी भाट हातात ढोल,ताशा,मृदंग,टाळ घेऊन उभे आहेत. तू उठल्यावर थोड्या वेळेची अपेक्षा करीत आहेत. (तेव्हा आता आपल्या) सुंदर मंचकावरून ऊठ. (त्यांची) सकाळ मंगलमय कर.

शंभुप्रिये तव स्तुती करण्यास झांजा
ताशा पखावज नि ढोलहि वाद्य साजा ।
हाती धरून जमल्या स्तुतिगायकांना
मंचास त्यागुन, उषा शुभ दे तयांना ॥ ०६ 


मातर्निरीक्ष्य वदनं भगवान् त्वदीयम्
नैवोत्थितः शशिधिया शयितस्तवाङ्के ।
संबोधयाशु गिरिजे विमलं प्रभातम्
जातं महेशदयिते कुरु सुप्रभातम् ॥ ०७॥

मराठी– हे माते, तुझ्या मांडीवर झोपलेला तो सुंदर चंद्र मुद्दामच तुझे मुख पाहून उठत नाही. हे पर्वतकन्ये, त्याला ताबडतोब सांग, शुभ्र पहाट झाली आहे. हे शंकराच्या प्रियतमे, सर्वांची सकाळ आनंददायी कर.

मांडीवरी तव शशी निजला उठेना
मुद्दाम, राजस, मुखा बघुनी बधेना ।
झाली पहाट सुचवी उजळीत त्याला
शंभुप्रिये सुखद दे दिन या जगाला ॥ ०७              


अन्तश्चरन्त्यास्तव भूषणानाम्
झल्झल्ध्वनिं नूपुरकङ्कणानाम् ।
श्रुत्वा प्रभाते तव दर्शनार्थी
द्वारि स्थितोऽहं कुरु सुप्रभातम् ॥ ०८॥

मराठी– पहाटे तुझ्या हलत्या दागिन्यांचा, (पायीचे) नूपुर, (हातातली) कांकणे यांचा झलझल असा आवाज ऐकून तुझे दर्शन घेण्यासाठी मी तुझ्या दारात उभा आहे. (तू माझी) सकाळ मंगलमय कर.

आभूषणे कंकण हालताती
झल्झल तसे पैंजण वाजताती ।
आवाज तो ऐकुन दर्शनार्थी
दारी उभा मी, सुख दे प्रभाती ॥ ०८


वाणी पुस्तकमंबिके गिरिसुते पद्मानि पद्मासना
रंभा त्वंबरडंबरं गिरिसुता गङ्गा च गङ्गाजलम् ।
काली तालयुगं मृदङ्गयुगलं वृन्दा च नन्दा तथा ।
नीला निर्मलदर्पण धृतवती तासां प्रभातं शुभम् ॥ ०९॥

मराठी– हे हिमालयतनये अंबिके (तुझ्यासमोर) वाणी हातात ग्रंथ, लक्ष्मी कमळे, (अप्सरा) रंभा वस्त्रप्रावरणांचा गठ्ठा  तर पर्वतकन्या गंगा गंगाजल, काली (संगीतदेवता) वृंदा व (संगीतमूर्छना) नंदा यांच्यासह तालवाद्यांची मृदंगांची जोडी घेऊन आणि नीला देवी स्वच्छ आरसा धरून उभी आहे. त्यांची सकाळ मंगलमय कर.

वाणी ग्रंथ करी धरी हरप्रिये, राजीव घे भार्गवी             (भार्गवी=लक्ष्मी)
रंभा प्रावरणे करी धरुन, घे गंगाजला जान्हवी ।
काली दंग मृदंग संग भवती वृंदा नि नंदा, धरी
नीला दर्पण स्वच्छ, मंगल पहाटेची प्रभा त्यां करी ॥ ०९


उत्थाय देवि शयनाद्भगवान् पुरारिः
स्नातुं प्रयाति गिरिजे सुरलोकनद्याम् ।
नैको हि गन्तुमनघे रमते दयार्द्रे
ह्युत्तिष्ठ देवि शयनात्कुरु सुप्रभातम् ॥ १०॥

मराठी– हे पर्वतकन्ये देवी, (तीन) नगरांचा शत्रू ईश्वर(शंकर), मंचकावरून उठून स्वर्गलोकातील नदी (गंगा) मध्ये स्नान करण्यासाठी निघाला आहे. हे दयापूर्ण अनघे, (पण त्याला) एकट्याला जाण्यात सुख वाटत नाही. तू मंचकावरून ऊठ. (सर्वांसाठी) सकाळ शुभप्रद कर.

सोडून शेज निघतो शिव स्वर्ग गंगे
स्नानास निर्जन परी नच चित्त रंगे ।
देवी त्यजून तव मंचक ऊठ आता
माते शुभप्रद पहाट करी समस्ता ॥ १०

*********************

धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

2 Comments on श्रीकामाक्षीसुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग १

  1. धनंजय,
    तू हे फार सुरेख काम केले आहे. मला पाठवल्याबद्दल धन्यवाद.

  2. फारच छान. बोरकर सरांचे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. सुलभ मराठी भाषांतर अप्रतिम आहे

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..