कामाक्षी सुप्रभातम्- मराठी अर्थासह भाग ३
त्वं विश्वनाथस्य विशालनेत्रा
हालस्यनाथस्य नु मीननेत्रा ।
एकाम्रनाथस्य नु कामनेत्रा
कामेशजाये कुरु सुप्रभातम् ॥ २३॥
मराठी– तू (काशी) विश्वनाथाची विशालनयना, (मदुराई) हालस्यनाथाची (माशासारखे लांबट डोळे असलेली) मीननयना, तर (कांचीपुरम) एकाम्रनाथाची (इच्छापूर्ती करणारी) कामनयना आहेस. मदनाला जिंकणा-या शंकराची पत्नी असलेल्या देवी तू आमची सकाळ शुभप्रद कर.
तू विश्वनाथास विशालनेत्रा
हालस्यनाथासहि मत्स्यनेत्रा ।
एकाम्रनाथास सुकामनेत्रा
दे पार्वती मोद प्रभात सत्रा ॥ २३
श्रीचन्द्रशेखर गुरुर्भगवान् शरण्ये
त्वत्पादभक्तिभरितः फलपुष्पपाणिः ।
एकाम्रनाथदयिते तव दर्शनार्थी
तिष्ठत्ययं यतिवरो मम सुप्रभातम् ॥ २४॥
मराठी– हे (भक्तांचे) आश्रयस्थान असलेल्या एकाम्रनाथाच्या प्रियतमे, हा तुझ्या पायी भक्तिभावाने परिपूर्ण (माझा) यतिश्रेष्ठ गुरू भगवान श्रीचंद्रशेखर हाती फल व फूल घेऊन तुझ्या दर्शनासाठी थांबला आहे. माझी सकाळ शुभप्रद कर.
श्री चंद्रशेखर गुरू फळफूल हाती
पायी तुझ्या शरण श्रेष्ठ उभे रहाती ।
एकाम्रनाथरमणी, तुज पाहण्याला
माझी सकाळ कर मंगल या जगाला ॥ २४
एकाम्रनाथदयिते ननु कामपीठे
सम्पूजिताऽसि वरदे गुरुशङ्करेण ।
श्रीशङ्करादिगुरुवर्यसमर्चिताङ्घ्रिम्
द्रष्टुं स्थिता वयमये कुरु सुप्रभातम् ॥ २५॥
मराठी– हे वरदायिनी, एकाम्रनाथाच्या प्रियतमे, खरोखर गुरु शंकराने तुझी कांची कामकोटी पीठात अत्यंत आदरपूर्वक पूजा केली. श्री शंकराचार्यादि श्रेष्ठ गुरूंनी पूजिलेली तुझी पावले पाहण्यासाठी आम्ही थांबलो आहोत. तू आमची सकाळ मंगलमय कर.
एकाम्रनाथरमणी, गुरु शंकराने
कांचीस्थळी चरणपूजन आदराने ।
आचार्य वंदित पदे वरदे पहाया
आलो, सकाळ शुभ तू कर शंभु जाया ॥ २५
दुरितशमनदक्षौ मृत्युसन्तासदक्षौ
चरणमुपगतानां मुक्तिदौ ज्ञानदौ तौ ।
अभयवरदहस्तौ द्रष्टुमंब स्थितोऽहं
त्रिपुरदलनजाये सुप्रभातं ममार्ये ॥ २६॥
मराठी– हे तीन नगरांचा नाश करणा-या (शिवा) च्या भार्ये, अंबे, मी पातकांची शांती करण्यात दक्ष असणारे, मरणाची भीती नाहीशी करण्यात दक्ष असणारे, पाय़ाशी जळीक साधणा-यांना मोक्ष, ज्ञान देणारे अभय वरदान देणारे (तुझे) हात पाहण्यासाठी उभा आहे. माझी सकाळ शुभप्रद कर.
करित कुटिलशांती घालवी मृत्यु भीती
शरण जवळ येता मुक्ति नि ज्ञान देती ।
अभय वरद हातां थांबलो पाहण्याला
पुररिपु-रमणीच्या, दे मला मोद काला ॥ २६
मातस्त्वदीयचरणं हरिपद्मजाद्यैः
वन्द्यं रथाङ्गसरसीरुहशङ्खचिह्नम् ।
द्रष्टुं च योगिजनमानसराजहंसं
द्वारि स्थितोस्मि वरदे कुरु सुप्रभातम् ॥ २७॥
मराठी– हे माते, चक्र, कमळ, शंखाचे चिन्ह असलेले तुझे पाऊल विष्णू-लक्ष्मी यांनाही वंदनीय आहे. योगी जनांच्या मनासाठी जे राजहंसच आहे, त्याला बघण्यासाठी मी दरवाज्यात उभा आहे. तू माझी सकाळ शुभप्रद कर.
चिन्हे पदी वलय शंख सरोज जेवी
विष्णू रमा इतरही म्हणती नमावी ।
जे राजहंस मुनिमानसि त्या बघाया
दारी उभा, शुभ उषा कर तू जिवा या ॥ २७
पश्यन्तु केचिद्वदनं त्वदीयं
स्तुवन्तु कल्याणगुणांस्तवान्ये ।
नमन्तु पादाब्जयुगं त्वदीयाः
द्वारि स्थितानां कुरु सुप्रभातम् ॥ २८॥
मराठी– कोणी तुझे मुखदर्शन करू देत, तर इतरांना तुझ्या हितकारी गुणांची प्रशंसा करू देत. कोणी तुझ्या चरणकमलांच्या युगुलाला नमस्कार करू देत. तुझ्या दारी आलेल्या सर्वांची सकाळ आनंदमयी कर.
घेवो कुणी दर्शन या मुखाचे
करो गायना हीतकारी गुणांचे ।
पदांबुजांच्या युग्मा नमू दे
दारी उभे मंगल त्यां उषा दे ॥ २८
केचित्सुमेरोः शिखरेऽतितुङ्गे
केचिन्मणिद्वीपवरे विशाले ।
पश्यन्तु केचित्त्वमृदाब्धिमध्ये
पश्याम्यहं त्वामिह सुप्रभातम् ॥ २९॥
मराठी– कोणी मेरू पर्वताच्या अत्त्युच्च शिखरावर, कोणी श्रेष्ठ रत्नद्वीपावर तर कोणी अमृत सागरात पाहोत. मी (मात्र) तुला येथे या शुभ सकाळी पहात आहे.
अत्त्युच्च मेरू शिखरी बघू दे
कोणा हि–यांच्या बेटी दिसू दे ।
कोणी बघो अमृत सागरी वा
मी पाहतो येथ, सुकाळ व्हावा ॥ २९
शंभोर्वामाङ्कसंस्थां शशिनिभवदनां नीलपद्मायताक्षीं
श्यामाङ्गां चारुहासां निबिडतरकुचां पक्वबिंबाधरोष्ठीम् ।
कामाक्षीं कामदात्रीं कुटिलकचभरां भूषणैर्भूषिताङ्गीं
पश्यामः सुप्रभाते प्रणतजनिमतामद्य नः सुप्रभातम् ॥ ३०॥
मराठी– शंकराच्या डाव्या बाजूस बसलेली,(पूर्ण) चंद्रासमान मुख असणारी, निळ्या कमळासारखे नेत्र असलेली,सावळ्या रंगाची, गोड हास्य असलेली, घट्ट स्तनांची, पिकलेल्या तोंडल्यासमान ओठांची, भरदार केसांची, अलंकारांनी सजलेली, अशी इच्छिलेले सर्व देणारी कामाक्षी आम्ही पाहतो. तिला नमन करणा-या जनांची सकाळ शुभप्रद होवो.
डावी बाजू हराची, शशिसममुख की, नेत्र नीलोत्पलाचे
काळी कांती, हसू मोहक, बळकट स्तना, पक्व तोंडल्याचे ।
ओठांचे रंग, काळे कच, तनु सजविली, दानही इच्छिताचे
कामाक्षीचे असे दर्शन, नमति तयां मोदकारी उषेचे || ३०
कामप्रदाकल्पतरुर्विभासि
नान्या गतिर्मे ननु चातकोऽहम् ।
वर्षस्यमोघः कनकांबुधाराः
काश्चित्तु धाराः मयि कल्पयाशु ॥ ३१॥
मराठी– तू इच्छिलेले देणा-या कल्पतरू प्रमाणे झळकत आहेस. मी खरोखर चातक पक्ष्याप्रमाणे आहे. मला दुसरा कोणताच मार्ग दिसत नाही. तू अमोघ अशा सोन्याच्या अमृतधारांचा वर्षाव करतेस. त्यातील काही धारा तू माझ्या वाटणीला तात्काल येऊ दे.
देता हवे तू द्रुम कल्प साचा
रस्ता चुके जैं मम चातकाचा ।
सौवर्ण धारा पडती अमोघ
त्यातील थोडा मज राख ओघ ॥ ३१
त्रिलोचनप्रियां वन्दे वन्दे त्रिपुरसुन्दरीम् ।
त्रिलोकनायिकां वन्दे सुप्रभातं ममांबिके ॥ ३२॥
मराठी– तीन नेत्र असणा-या(शंकरा)च्या भार्येला मी नमस्कार करतो. तिन्ही नगरांत स्वरूपवान असणा-या (कामाक्षीला) मी प्रणाम करतो. तिहीं लोकांच्या नायिकेला मी वंदन करतो. हे अंबिके माझी सकाळ मंगलमय कर.
त्रिलोचन प्रिये वंदू त्रिपुर सुंदरी वंदू ।
त्रिलोक नायिके वंदू मोदे उषःसमा साधू ॥ ३२
कृतज्ञता
कामाक्षि देव्यंब तवार्द्रदृष्ट्या
कृतं मयेदं खलु सुप्रभातम् ।
सद्यः फलं मे सुखमंब लब्धं
तथा च मे दुःखदशा गता हि ॥ ३३॥
मराठी– हे कामाक्षी देवी खरोखर तुझ्या करुणामय दृष्टीमुळे मी हे सुप्रभात स्तोत्र रचले. हे माते, आज त्याचे सुखमय फळ मला मिळाले, तसेच माझी दुःखाची स्थिती नाहीशी झाली.
कामाक्षिच्या दृष्टिकृपेमुळे हे
सकाळचे हे निज स्तोत्र आहे ।
त्याचे मला बक्षिसही मिळाले
आनंद आला अजि, दुःख गेले ॥ ३३
प्रार्थना
ये वा प्रभाते पुरतस्तवार्ये
पठन्ति भक्त्या ननु सुप्रभातम् ।
शृण्वन्ति ये वा त्वयि बद्धचित्ताः
तेषां प्रभातं कुरु सुप्रभातम् ॥ ३४॥
मराठी–
किंवा, हे देवी, जे सकाळी तुझ्यासमोर हे स्तोत्र भक्तीने म्हणतात अथवा तुझ्या ठायी मन एकाग्र करून ऐकतात त्यांची सकाळ तू मंगलमय कर.
तुझ्या समोरी जन जे प्रभाती
भक्तीभराने तव स्तोत्र गाती ।
वा ऐकती ठेउन भाव चित्ती
त्यांचे सुमंगल कर सुप्रभाती ॥ ३४
इति लक्ष्मीकान्त शर्मा विरचितम् श्रीकामाक्षीसुप्रभातम् समाप्तम् ॥
असे हे लक्ष्मीकांत शर्मा यांनी रचलेले श्रीकामाक्षीसुप्रभातम् समाप्त.
***********************
धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)
खरोखर अतृतीम भाषांतर