गीर्देवतैति गरुड़ध्वज सुंदरीति शाकम्भरीति शशिशेखर वल्लभेति।
सृष्टि-स्थिति-प्रलय केलिषु संस्थितायै तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरूण्यै ।।१०।।
आई आदिशक्ती परांबेचे कार्य तीन प्रकारे चालत असते. या तीन पद्धतींनाच त्रिगुण असे म्हणतात. सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या द्वारे कार्य करणाऱ्या आदिशक्तीच्या तीन रूपांना महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती असे म्हणतात.
या तीन रूपात कार्य करणाऱ्या तीन शक्तींचे वर्णन येथे आचार्यश्री करीत आहेत.
गीर्देवतैति- गीरा म्हणजे वाणी. त्या वाणीची देवता ती गीर्देवता. अर्थात आई सरस्वती.
गरुड़ध्वज सुंदरीति – गरुडध्वज म्हणजे भगवान विष्णू. त्यांच्या रथाच्या ध्वजावर गरुडाचे चित्र काढलेले असते. त्यांची सुंदरी अर्थात प्रियतमा. म्हणजे आई जगदंबा महालक्ष्मी.
शाकम्भरीति – जगदंबेचे एक नाव शाकंबरी असे आहे. कधीकाळी प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सर्व ऋषी-मुनींनी प्रार्थना केल्यामुळे आई जगदंबा प्रगट झाली. सगळ्या भक्तांच्या उदरभरणाची सोय व्हावी म्हणून तिने सर्वत्र शाक अर्थात भाज्या निर्माण केल्या. याच्या आधारे भक्तांचे भरणपोषण केल्यामुळे हे नाव रूढ झाले.
शशिशेखर वल्लभेति- शशि म्हणजे चंद्र. त्याला शेखर म्हणजे मस्तकावर धारण करणारे. अर्थात भगवान श्री शंकर. त्यांची वल्लभा अर्थात प्रियतमा. म्हणजे देवी पार्वती.
सृष्टि स्थिति प्रलय केलिषु संस्थितायै- या तीन स्वरूपात, त्या त्रिदेवांसह, सृष्टी निर्मिती, स्थिती अर्थात पालन आणि लय अर्थात विनाश या तीनही केली म्हणजे लीलांमध्ये आधारभूत स्वरूपात विद्यमान असणाऱ्या,
तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरूण्यै- त्या त्रिभुवनैकगुरू अर्थात त्रैलोक्यातील सर्व श्रेष्ठ तत्व असणाऱ्या भगवान विष्णूंची तरुणी अर्थात सुंदरीला नमस्कार असो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply