सम्पत्कराणि सकलेन्द्रिय नन्दनानि साम्राज्यदान विभवानि सरोरूहाक्षि।त्वद्वंदनानि दुरिताहरणोद्यतानि मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये।।1१३।।
मान्ये- हे सगळ्यांना मान्य अर्थात वंदनीय असणाऱ्या आई जगदंबे! सर्वसामान्य मानवच नव्हे तर ईश्वर महेश्वर देखील जिच्या योग्यतेचा सन्मान करतात अशी.
सरोरूहाक्षि- हे कमलनयने. सर म्हणजे तलाव. त्यात उरुह म्हणजे जन्माला येऊन वर येणारे. अर्थात कमळ. तसे जिचे अक्ष म्हणजे डोळे आहेत अशी.
येथे केवळ आकाराच नव्हे तर गुणांचाही विचार आहे. ते कमळ जसे भुंग्यांना आकर्षित करते तशी जिची कृपादृष्टी साधकांना आकर्षित करते, अशी.
त्वद्वंदनानि- तुला केलेली वंदने अर्थात नमस्कार, प्रार्थना.
कशासाठी करायची ही प्रार्थना? तरीही प्रार्थना अलौकिक फलदायी आहे.
ही प्रार्थना काय काय देते? याचे वर्णन करताना पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,
सम्पत्कराणि- सकल संपत्तीला उपलब्ध करून देणारी. जिच्या कृपेने बाह्य जगतातील धनसंपत्ती आणि अंतर्मनातील शम,दम इत्यादी षट् संपत्ती, साधकांना प्राप्त होते अशी.
सकलेन्द्रिय नन्दनानि- सकल इंद्रियांना आनंद देणारी. बाह्य जगतातील पंचकर्मेद्रिये, पंचज्ञानेंद्रिय आणि अंतर्गत इंद्रिय मन अशा अकराही इंद्रियांना आनंद देणारी.
शब्द, स्पर्श इ. पाचही पद्धतीने प्राप्त होणारे सर्व आनंद प्रदान करणारी. त्या आनंदाला साधनीभूत होणारी साधने प्रदान करणारी.
साम्राज्यदान विभवानि- आपल्या भक्तांना साम्राज्य दान देण्याचे वैभव असणारी.
दुरिताहरणोद्यतानि- दुरित अर्थात पाप, वाईट ,अमंगल. त्याचे हरण करण्यास म्हणजे नष्ट करण्यास उद्यत म्हणजे कायम सिद्ध असणारी.
अशी ही आईची वंदना,
मामेव- माझ्यावरच, मलाच.
मातरनिशं – हे माते अनिश अर्थात सतत.
कलयन्तु- प्राप्त होत राहो.
अर्थात अशा सर्व अद्वितीय गुणांनी युक्त असणारी ही वंदना सतत करण्याची शक्ती मला प्राप्त होवो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply