यत्कटाक्षसमुपासना विधि: सेवकस्य सकलार्थ सम्पद:।
संतनोति वचनाङ्गमानसै-
स्त्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे।।१४।।
या जगात भक्तासाठी करण्यासारखे एकमेव कार्य काही असेल तर ते केवळ आणि केवळ महालक्ष्मीची उपासना हेच आहे. अशी अनन्यशरणता सांगत आचार्यश्री येथे आई जगदंबेचे वैभव स्पष्ट करीत आहेत.
ते म्हणतात,
यत्कटाक्षसमुपासना विधि:- त्या आई जगदंबेच्या कटाक्षाच्या उपासनेचा विधिच,
सेवकस्य सकलार्थ सम्पद:- तिचा सेवकांना सर्व अपेक्षित संपत्तीला
संतनोति- वृद्धिंगत करणारा आहे.
आई महालक्ष्मीच्या कृपेनेच साधकाला जी जे हवे ते सर्व प्राप्त होऊ शकते. त्याच्या सर्व प्रकारच्या संपत्तींचा विकास होतो.
येथे त्या कटाक्षां ची उपासना करावी असे म्हटले आहे. मूर्तीची उपासना ठीक आहे. पण कटाक्षांची उपासना कशी करायची? तर उपासनेचे अंतीम फल आहे, उपास्य देवतेचे आपल्याकडे लक्ष जाणे. ती लक्ष जाणे म्हणजे तिने पाहणे. म्हणजे कटाक्ष.
ती केव्हा पाहील?तर तिला आवडती गोष्ट असेल त्यावेळी. तिला आवडती गोष्ट कोणती? तर भगवान श्रीहरी.
सोप्या शब्दात आपल्या हृदयात श्रीहरींचे स्थान असेल तर आईची कृपादृष्टी आपल्यावर पडेल.
यासाठी, मुरारि-मुर नामक राक्षसाचे शत्रु श्रीहरी. कृतयुगामध्ये नाडीजंघ नावाच्या राक्षसापासून मुर नावाचा राक्षस जन्माला आल्याची पुराणात कथा आहे.
त्याचे आणि भगवान विष्णूंचे प्रचंड युद्ध झाले. ज्यात तो मरेना. त्यावेळी थकून हिमालयात विश्राम करणाऱ्या विष्णूंच्या शरीरातून निघालेल्या शक्तीने त्याचा विनाश केल्याची कथा आहे.
त्या शक्तीला पुढे उत्पन्ना एकादशी असे नाव पडले. अशा त्या श्रीहरींची,
हृदयेश्वरीं- हृदयाची स्वामिनी असणाऱ्या,
त्वां- तुला,
वचनाङ्गमानसै- वचन म्हणजे वाणीने, अंग म्हणजे शरीराने आणि मानसै: म्हणजे मनाने, अर्थात सर्व मार्गाने, परिपूर्णरीत्या
भजे- भजत असतो. उपासना करतो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply