सरसिजनिलये सरोज हस्ते धवलतमांशुकगन्धमाल्यशोभे।भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम्।।१५।।
आई जगदंबेला प्रसन्नतेची प्रार्थना करण्यासाठी पूज्यपाद आचार्यश्री तिचे गुण वैभव वर्णन करीत आहेत.
ते म्हणतात हे आई जगदंबे! तू कशी आहेस ? तर,
सरसिजनिलये- सरसिज म्हणजे कमळ तर निलये म्हणजे निवास करणारी. आई जगदंबा कमळात निवास करते. इथे केवळ एका फुलाचा विचार नाही. ते प्रतीक आहे.
कमळ जसे चिखलात जन्माला येते, त्यानंतर पाण्यात वर चढते, पाण्याने स्वतःवरील चिखल काढते. त्यानंतर वर हवेत येते आणि सूर्याच्या दिशेने झेपावते. तशी ज्या साधकाची वृत्ती पार्थिवापासून तेजापर्यंत विकसित होत जाते, त्या साधकाच्या मनात निवास करणारी ती खऱ्या अर्थाने सरसिजनिलया.
सरोज हस्ते- हातात कमल धारण करणारी. अर्थात अशा वृत्तीने युक्त असणार्या साधकांना उन्नसाठी हात देणारी.
धवलतमांशुक- धवल म्हणजे पांढरे. त्याला तम प्रत्यय लावला. ज्यावेळी अनेक गोष्टीत तुलना करून ह्यापैकी सर्वश्रेष्ठ असे वर्णन करायचे असते त्यावेळी तम प्रत्यय लावतात.अर्थात धवलतम म्हणजे अत्यंत पांढरेशुभ्र, अंशुक म्हणजे रेशमी वस्त्र.
गन्धमाल्यशोभे- गंध म्हणजे चंदनतिलक. माल्य म्हणजे मोत्यांच्या माळा. या सगळ्यांनी शोभून दिसणारी.
भगवति- भग म्हणजे तेज, ऐश्वर्य. त्याने युक्त असणारी ती भगवती.
हरिवल्लभे- भगवान श्रीहरींची वल्लभा म्हणजे प्रियतमा.
मनोज्ञे- अत्यंत मनोहारी असणारी. भक्तांच्या मनात निवास करणारी. त्यांचे मन हरण करणारी. त्रिभुवनभूतिकरि- संपूर्ण त्रिभुवनाचे भूती म्हणजे कल्याण करणारी.
ती आई महालक्ष्मी,
प्रसीद मह्यम्- माझ्यावर प्रसन्न होवो. मला सर्व ऐश्वर्यदायक गोष्टी प्रदान करो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply