कमले कमलाक्षवल्लभे त्वं करुणापूरतरङ्गतैरपाड़ंगै:।
अवलोकय मामकिंचनानां
प्रथमं पात्रमकृत्रिमं दयाया : ।।१७।।
कमले- आई जगदंबेलाच येथे कमला असे म्हटलेले आहे. ती केवळ कमळावर बसली आहे एवढाच अर्थ नाही.
ती कमळाप्रमाणे उर्ध्वगामी वृत्तीची आहे. कमळाप्रमाणे सौंदर्यसंपन्न आहे. भक्तगणरुपी भुंग्यांच्या आकर्षणाचा विषय आहे.
त्वं – हे आई तू,
कमलाक्षवल्लभे – कमलाप्रमाणे अक्ष म्हणजे डोळे असणाऱ्या भगवान विष्णूंची वल्लभा म्हणजे प्रियतमा आहेस.
करुणा- कारुण्य अर्थात भक्तां बद्दलची दया.
पूर- त्याने परिपूर्ण असणारी. त्याचा जणू पूर आलेली. दया ओसंडून वाहत असलेली.
तरङ्गतै: – तरंगीत अर्थात चंचल असणाऱ्या,
अपाड़ंगै:- डोळ्यांच्या कडांनी.
अवलोकय माम् – माझे अवलोकन कर. माझ्याकडे पहा.
अवलोकय अकिंचनानां- तुझ्या भक्तीशिवाय माझ्याजवळ दुसरे काहीही नाही. त्या अर्थाने मी अकिंचन आहे. पूर्णपणे तुझ्यावरच आश्रित आहे.
प्रथमं पात्रम् – त्या दये साठी मी प्रथम पात्र आहे. हा शब्दच मोठा गोड आहे.
जशी अनेक गोष्टींची आवश्यकता तर अनेकांना असते. पण त्या गोष्टीचे वाटप करताना, सगळ्यात जास्त आवश्यकता ज्याला आहे त्याला प्रथम देण्यात येते. त्यादृष्टीने मी प्रथम पात्र आहे. अर्थात तुझ्या दयेचा मी सर्वात अधिक गरजवंत आहे. दुसरी गोष्ट जशी एखादी आई एखादा नवीन पदार्थ तयार केला तर घरातील सगळ्या लोकांच्या आधी आपल्या लाडक्या लेकराला देते. त्यादृष्टीने मी तुझा लेक असल्याने, तुझ्या दयेचा प्रथम अपात्र आहे.
कशी आहे ती दया?
अकृत्रिमं दयाया : – अकृत्रिम अर्थात अत्यंत शुद्ध. पवित्र. मूलभूत.
आईच्या दये मध्ये कोणत्याही अपेक्षेची भेसळ नाही. व्यवहारात केलेल्या मदती प्रमाणे परतफेडीची कृत्रिमता नाही.
अशी दया तू मला प्रदान कर.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply