मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारेः प्रेमत्रपा-प्रणहितानि गताऽऽगतानि।मालादृशोर्मधुकरीव महोत्पले या सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः ॥२॥
मुग्धा – अत्यंत शुद्ध,निर्मल, सरल, निष्पाप, अबोध. आई महालक्ष्मीची दृष्टी अशी आहे.
मुहुर्विदधती वदने मुरारेः- ती दृष्टी वारंवार भगवान मुरारी अर्थात मुर राक्षसाचे शत्रू भगवान श्रीहरींच्या मुखकमलावर जात असते.
गताऽऽगतानि- जात राहते .येत राहते. ही आचार्यश्री ची रचना मोठी सुंदर आहे. आईची दृष्टी भगवंताच्या मुखावर जाते .परत येते. पुन्हा जाते. पुन्हा येते. यामध्ये तिच्या चांचल्य गुणाचा भाग आहे तसाच सौंदर्याचा देखील.
ती दृष्टी स्थिर का नाही? याचे नितांत सुंदर वर्णन करताना आचार्य श्री कारण देतात,
प्रे
मत्रपा-प्रणहितानि- ची दृष्टी प्रेम आणि लज्जा यांनी भरलेली आहे. श्रीहरींवर उत्कट प्रेम असल्याने ती दृष्टी भगवंताच्या मुखकमलाकडे जाते आणि दृष्टादृष्ट होताच त्रपा लज्जेने आईची दृष्टी खाली वळते. असे नितांत रमणीय दृश्य आचार्य वर्णन करीत आहेत.
त्याच सौंदर्याला उपमा देताना ते म्हणतात,
मालादृशोर्मधुकरीव महोत्पले या- एखाद्या महोत्पल म्हणजे पूर्णप्रफुल्लित कमळावर मधुकरींची रांग यावी तशी. वास्तविक येथे फक्त आई लक्ष्मीचीच दृष्टी आहे. पण तीच वारंवार जाणे-येणे करत असल्याने जणू काही रांग वाटत आहे. सातत्याने त्या दृष्टीचे आवागमन एखादा दृष्टीचा समुदाय असल्यासारखे वाटत आहे.
सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः- सागर संभवा अर्थात समुद्रातून जन्माला आलेली. समुद्रमंथनाच्या दिव्य प्रसंगात समुद्रातून जी चौदा रत्ने प्रगटली यामध्ये आई महालक्ष्मी चे वर्णन आहे. त्याचा संदर्भ वापरत आचार्य श्री म्हणतात ,समुद्रातून प्रकट झालेल्या आई महालक्ष्मीची ती दृष्टी मला वैभव प्रदान करो.”
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply