विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्ष- मानन्दहेतुरधिकं मुरविद्विषोsपि ।
ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्ध-
मिन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः ॥ ३ ॥
आई महालक्ष्मीच्या त्या नेत्र कटाक्षाचा अद्भुत महिमा सांगताना आचार्यश्री म्हणतात,
विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्षम्- विश्व अर्थात जग. अमर अर्थात देवता. इंद्र अर्थात सर्वश्रेष्ठ, राजा. त्याचे पद म्हणजे अधिकार. अर्थात या जगाचाच नव्हे तर देवांचाही राजा असलेल्या इंद्राच्या पदाचा अधिकार. आई जगदंबेच्या नेत्र कटाक्षाने असे देवराज इंद्राचे पद देखील सहज मिळू शकते. मग सामान्य प्राप्तीची कथा ती काय?
आनन्दहेतुरधिकं मुरविद्विषोsपि- मूर नावाच्या राक्षसाचे विद्विष् अर्थात शत्रू असणाऱ्या भगवान श्री विष्णूंना देखील अधिक आनंद देणारा असा हा नेत्रकटाक्ष आहे. ‘श्रीहरींना देखील’ हा उल्लेख मोठा महत्वाचा आहे. भगवंताचे स्वरूप आनंदरूप आहे. त्यांना बाहेरून आनंद मिळण्याची आवश्यकता नाही. त्यांनादेखील आनंद मिळतो. मग सामान्य दुखी जीवांना किती आनंद देत असेल? याचा विचार जागवणारा हा उल्लेख.
इन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः- इंदीवर म्हणजे निळ्या रंगाचे कमळ. त्याचे उदर म्हणजे आपला गाभा. सहोदर अर्थात त्याच्या सौंदर्यासमान असणारा असा देवी इंदिरा म्हणजे आई लक्ष्मी चा नेत्रकटाक्ष आहे.
ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्धम् – शेवटी आचार्यश्री प्रार्थना करतात की आईचा तो दिव्य नेत्र कटाक्ष अर्ध क्षण का होईना माझ्यावर कृपादृष्टीवर्षाव करो. कारण माझ्या उद्धारासाठी तेवढाही पर्याप्त आहे.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply