आमीलिताक्षमधिगम्य मुदामुकुन्द-मानन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम्।
आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं
भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयनाङ्गनाया:।।४।।
आनंदकंद म्हणजे आनंदाचा जणू भरगच्च संग्रह. मुकुंद म्हणजे मुक्ती देणारे, भगवान श्रीहरी. त्यांना मुदा म्हणजे आपल्याच आनंदात, आमीलिताक्षमधिगम्य डोळे मिटून शांत पहुडलेले पाहून,
अनिमेषमनङ्गतन्त्रम्- अनिमिष अर्थात पापणी देखील न ललवता. अनंग म्हणजे भगवान मदन. त्यांचे तंत्र म्हणजे प्रेम.
सगळ्याचा एकत्रित विचार करता आनंदकंद भगवान श्रीहरी आपल्याच आनंदात नेत्र मिटून बसलेले आहे असे पाहून, आता ते पहात नसल्याने त्यांच्याकडे अनिमिष नेत्राने जी पाहत आहे आणि तसे पाहिल्याने जिच्यामध्ये प्रेमभाव ओतप्रोत भरला आहे. अशी आईची दिव्यदृष्टी आहे.
आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं- आकेकर म्हणजे डोळ्याचा किनारा. कनीनिक म्हणजे डोळ्यातील पुतळी तर पक्ष म्हणजे पापण्या.
भगवान श्रीविष्णु आपल्याकडे पहात नाही असे म्हटल्यावर आई महालक्ष्मीची लज्जा थोडी दूर झाली आहे. त्यामुळे आता ती टक लावून भगवंताकडे पहात आहे. इतर वेळा जेव्हा ती भगवंताकडे पाहते त्यावेळी प्रेमभाव तर जागृत होतो पण श्रीहरींनी तिच्याकडे पाहिल्यावर त्याची जागा लज्जा घेते. त्या स्त्रीसुलभ लज्जेने आईचे नेत्र खाली वळतात.मात्र आता ते पाहत नसल्याने ती त्यांच्याकडे टक लावून पहात आहे. आता फक्त प्रेमभाव आहे.
अशा वेळी तिच्या पापण्या अविचल आहेत आणि डोळ्यातील बुबुळे नेत्रांच्या कडांशी स्थिर झाली आहेत.
भुजङ्गशयनाङ्गनाया:- भुजंग अर्थात महासर्प. शेषनाग. त्याच्यावर जे शयन करतात त्यांची अंगणा म्हणजे पत्नी असणाऱ्या देवी लक्ष्मीचे ते नेत्र कटाक्ष,
भूत्यै भवेन्मम- माझ्या कल्याणाला कारणीभूत होवोत.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply