बाह्वन्तरे मधुजित: श्रितकौस्तुभेया हारावलीव हरिनीलमयी विभाति।कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला
कल्याणमावहतु मे कमलालयाया:।।५।।
बाह्वन्तरे- बाहू म्हणजे हात. त्यांच्या अंतरे म्हणजे आत मध्ये. दोन हातांच्या आत असणारा अवयव म्हणजे छाती.
मधुजित:- मधु नावाच्या राक्षसाला जिंकणारे. भगवान श्रीविष्णु.
विश्व रचनेच्या आरंभी भगवान श्रीविष्णूच्याच कानातून निघालेल्या मळा च्या दोन थेंबांमधून मधु आणि कैटभ या नावाचे दोन राक्षस जन्माला आल्याची कथा आहे. त्यांच्याशी युद्ध करून श्रीविष्णूंनी त्यांना मारले.
श्रितकौस्तुभेया- कौस्तुभ हे भगवान विष्णूच्या गळ्यातील रत्नाचे नाव. त्याने अलंकृत.
एकत्रित अर्थ पाहता, मधू राक्षसाचे विनाशक भगवान श्रीविष्णूंच्या वक्षस्थलावर रुळणाऱ्या कौस्तुभ मण्याने अलंकृत.
आई जगदंबेची दृष्टी वारंवार भगवान श्रीहरीच्या हृदयावर जात असल्याने तेथे असणाऱ्या कौस्तुभमण्याने ती दृष्टी अलंकृत होते असा भाव.
हारावलीव हरिनीलमयी विभाति- हरी म्हणजे हिरवा तर नील म्हणजे निळा. हिरवे रत्न पाचू तर निळे रत्न नीलम. महालक्ष्मी चे डोळे तसे हिरवट निळे आहेत. जणु त्या मण्यांची माळ तयार केली तर ती जशी दिसेल तशी आईची कटाक्ष मालिका विभाति म्हणजे शोभून दिसत आहे.
कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला- भगवंताला देखील जी काम म्हणजे प्रेमभावना प्रदान करते अशी ती कमलालयाया:- कमळामध्ये निवास करणाऱ्या आई महालक्ष्मीची कटाक्षमाला- वारंवार टाकलेले कटाक्ष यांची जणू माला.
कल्याणमावहतु मे – मला कल्याण प्रदान करणारी होवो.”
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply