कालाम्बुदालिललितोरसि कैटभारे-र्धाराधरे स्फुरति या तडिदंगनेव्।
मातु: समस्त जगतां महनीय मूर्ति
भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनाया:।।६।।
कालाम्बुदालिललितोरसि कैटभारे- अंबु म्हणजे पाणी. ते देणारा तो अंबुद म्हणजे ढग. ढगांचा खरा काळ पावसाळा. त्या काळातील ढग काळेशार असतात. त्यांची अली म्हणजे रांग. एकामागोमाग एक आल्यामुळे विशाल समूह वाटणाऱ्या आणि अत्यंत काळेशार दिसणाऱ्या.
कैटभारे:- कैटभ नावाच्या राक्षसाचे अरि म्हणजे शत्रू अर्थात भगवान श्रीविष्णु, त्यांच्या उरसि म्हणजे छातीवर.
धाराधरे स्फुरति या तडिदङगनेव्- धारा म्हणजे जलधारांना धारण करणारा म्हणजे मेघ. यावर तडीत अंगणा म्हणजे मेघाची विद्युत रूपी पत्नी. इव स्फुरति- ज्याप्रमाणे चकाकणारी, सौंदर्यपूर्ण दिसणारी.
एकत्रित पाहता, मेघावर चमकणाऱ्या विजेप्रमाणे भगवान श्री विष्णूंच्या काळ्याशार वक्षस्थलावर मस्तक ठेवल्यावर अधिकच सौंदर्यपूर्ण दिसणारी.
हे सौंदर्य पहायचे असेल तर एखाद्या सोनाराच्या दुकानात जावे. तेथे असलेल्या कसोटीच्या दगडावर उमटलेली सोन्याची रेघ आई लक्ष्मीचे स्वरूप असते. कसोटीचा दगड शाळीग्राम असतो . अर्थात भगवान विष्णू.
मातु: समस्त जगतां – सगळ्या जगाची आई असणाऱ्या महालक्ष्मीची,
महनीय मूर्ति- अत्यंत श्रेष्ठ अशी मूर्ती म्हणजे प्रगट झालेली दृष्टी, भार्गवनन्दनाया:- महर्षी भृगु आणि त्यांची पत्नी दक्षकन्या ख्याती यांच्या तपश्चर्येने देवी लक्ष्मीने त्यांच्या आश्रमात अवतार धारण केला. त्या संदर्भाने भार्गव कुळाला आनंद प्रदान करणारी दृष्टी,
भद्राणि मे दिशतु – मला कल्याणकारक बाबी प्रदान करो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply