इष्टाविशिष्टमतयोऽपि यया दयार्द्र-दृष्टया त्रिविष्टपपदं सुलभं लभन्ते।
दृष्टि: प्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टां
पुष्टिं कृषीष्ट मम पुष्करविष्टराया:।।९।।
इष्टाविशिष्टमतयोऽपि- इष्ट म्हणजे आवश्यक असलेली. विशिष्ट अर्थात योग्य प्रकारची.
त्याला अ उपसर्ग लावला. अर्थात विशिष्ट प्रकारची नसलेली.
मती म्हणजे बुद्धी.
अपि म्हणजे सुद्धा.
एकत्रित अर्थ केला तर ‘आवश्यक असणारी विशिष्ट प्रकारची बुद्धी नसली तरीसुद्धा.’
यया दयार्द्रदृष्टया- जिच्या दयापूर्ण दृष्टीने.
त्रिविष्टपपदं – स्वर्गातील स्थान.
सुलभं लभन्ते- सहजतेने प्राप्त होते.
अर्थात आई महालक्ष्मीच्या दयापूर्ण दृष्टीने ज्यांच्याजवळ स्वर्गात जाण्यासाठी आवश्यक बुद्धी नाही. तितकी ज्यांची पुण्य कर्मे नाहीत त्यांनादेखील सहजपणे स्वर्गाचे स्थान प्राप्त होते.
स्वर्गात जाण्यासाठी पुण्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारची बुद्धी असावी लागते. शास्त्राचे,यज्ञयागाचे ज्ञान असावे लागते. मात्र आईची कृपा झाली तर असे ज्ञान नसणाऱ्यांना सुद्धा, याच जगात धनसंपत्तीच्या आधारे स्वर्गीय आयुष्य जगता येते. हा भाव.
कशी आहे ती दृष्टी? तर प्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टां- प्रहृष्ट अर्थात पूर्णपणे फुललेल्या,
कमलोदर म्हणजे कमळाच्या आतील गाभ्याप्रमाणे.
दीप्तिरिष्टां- म्हणजे सौंदर्याने युक्त असलेली.
अर्थात कमळाच्या आत असणाऱ्या गाभ्याप्रमाणे परम कोमल, आकर्षक, रसपूर्ण अशी आईची दृष्टी आहे.
पुष्करविष्टरा- पुष्कर म्हणजे कमळ. तर विष्टर म्हणजे आसन. अर्थात कमळावर बसलेल्या, त्या आई महालक्ष्मीची दृष्टी,
पुष्टिं कृषीष्ट मम – मम म्हणजे माझे, पुष्टी म्हणजे कल्याण, कृषीष्ट म्हणजे करो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply