घटना घडली एके दिवशी प्रभू बसले जेवण्या,
रुख्मिणी त्यांचे जवळी होती वाढण्या ।।१।।
चट्कन उठूनी ताटावरुनी धावत गेले दारीं,
क्षणिक थांबूनी तेथे येऊनी बसले पाटावरी ।।२।।
प्रश्न पडला रुखमिणीस काय गडबड झाली,
श्रीकृष्णाची धावपळ तिजला नाही कळली ।।३।।
चौकशी करतां कृष्ण बदले कहाणी एका भक्ताची,
हरिनाम मुखी नाचत होता काळजी नव्हती लोकांची ।।४।।
वेडा समजोनी त्यासी दगड कुणी होते मारीत,
हरिनाम नाही सोडले वाहात असूनी रक्त ।।५।।
धावलो होतो त्याचेसाठीं करण्या त्याला मदत,
परि लहू बघूनी अंगावरती दगड घेतला हातात ।।६।।
समर्थ झाला आता तो रक्षण करण्या स्वतःचे,
हरिनाम सोडता मुखातून कारण नव्हते मदतीचे ।।७।।
ही झाली छोटी कहाणी सांगे जीवनाची तत्वे,
सर्वस्व अर्पिता प्रभूसी विश्वास ठेवा त्याते ।।८।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply