नवीन लेखन...

श्री क्षेत्र कनकेश्वर देवस्थान अलिबाग

पावसाळ्यात पहिल्या श्रावणी सोमवारी हजारो अलिबागकरांची पावले कनकेश्वरच्या प्राचीन शिवमंदिराकडे आपसूकच खेचली जातात. निसर्गाच्या कुशीत आणि उंच डोंगरावर असलेल्या या देवस्थानाकडे जण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक चोंढी कार्लेखिंड मार्गावरील मापगांव हुन मुख्य पायवाट तर अलिबाग रेवस रोडवरील झिराड गावातून जाणारी पायवाट.

श्रावणातल्या सोमवारी सकाळी सहा वाजता झिराड गावातून कनकेश्वरच्या डोंगरावर जाताना झिराड गांवातली घरे मागे पडल्यावर भाताची हिरवीगार शेतं लागतात शेतांच्या बांधांवरून आणि डोंगरावरून वाहत येणाऱ्या ओढ्यांच्या पाण्यातून चालताना हिरव्यागार सृष्टी सौंदर्याला बघताना एक वेगळाच उत्साह आणि प्रसन्नता मिळते.

झिराड गावातील कौलारू घरे पावसाळ्यात न्हाऊन निघाल्यासारखी वाटतात, या घरांच्या चुलीमधून निघणारा दाट धुर धुक्यात मिसळताना स्पष्ट दिसतो. पावसाच्या हलक्या सरी कोवळ्या उन्हासोबत लपाछपी करत ये जा करत असतात. सकाळचे कोवळे ऊन हिरव्यागार भातशेतीवर आणि झाडावेलींच्या गर्द पानांवर पसरतानाचे दृष्य फारच सुंदर आणि मोहक दिसते, डोंगराची चढाई सोडून पसरलेली सूर्यकिरणे kक्षणभर काय तासभर बघतच राहावी असा नैसर्गिक देखावा डोळ्यांसमोर असतो. पावसामुळे निसरडी झालेल्या पायवाटेला वेलींचा आणि झाडांच्या फांद्यांचा आधार असतो त्यामुळे चढताना कसलीच भिती वाटत नाही. डोंगर चढताना रंगीबेरंगी रानफुले जागोजागी लक्ष वेधून घेतात. पक्षी आणि रानपाखरांचा चिवचिवाट ऐकताना एखादे मधुर संगीत ऐकत आहोत की काय असा भास होतो, घनदाट जंगल किंवा एखाद्या अभ्यारण्यासारखी गर्द हिरवीगार झाडी, अरबी समुद्रावरून वाहत येणाऱ्या खाऱ्या वाऱ्याच्या झुळुका कनकेश्वरचा डोंगर चढताना बिलकुल थकवा जाणवू देत नाहीत.

या वाटेने जाताना जसं जसं डोंगर चढत जातो तस तसं पाठीमागे पश्चिमेला अरबी समुद्राचे दर्शन होत जाते. किहीम पासून ते आवास ची किनारपट्टी दिसते, थळ च्या आरसीएफ खत प्रकल्पातील धुर ओकणाऱ्या चिमण्या, धोकवडे आणि मांडव्या पर्यंतचा परिसर दृष्टीच्या टप्प्यात येतो. पावसाळ्यात किनारपट्टीजवळ गढूळलेले पाणी आणि त्या गढूळलेल्या पाण्याच्या पलीकडे अथांग निळा समुद्र दिसायला लागतो. याच समुद्रात असलेली खांदेरी उंदेरीची बेटं आणि त्यांच्याभोवती समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांचा पडलेला वेढा दिसतो.

कनकेश्वर हे स्वयंभू शिवमंदिर आहे परशुरामांनी निर्माण केलेल्या कनक डोंगरी या डोंगरावर असल्याने या अत्यंत सुबक अशा कोरीव शिवमंदिराला कनकेश्वर असे नांव पडले असावे. मंदिराचे बांधकाम जेवढे सुबक आणि सुंदर आहे तेवढेच मजबूत देखील आहे. कोकणात आढळणाऱ्या ईतर देवस्थानात असतात तसाच दीपस्तंभ येथे सुद्धा पाहायला मिळतो. मंदिराचा शितल गाभाऱ्यात असणारे शिवलिंग पाहिल्याबरोबर नतमस्तक व्हावेसे वाटते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला सिंह आणि त्यांच्या मागे हातात त्रिशूळ असलेल्या देवींच्या मुर्ती आकर्षक रंगसंगती मुळे अत्यंत सुबक दिसतात.

मंदिर परिसरात दगडी चिऱ्यांचे बांधकाम केलेला वर्तुळाकार तलाव आणि चौकोनी पुष्करणी आहे. तलावाभोवतीचे बांधकाम अत्यंत सुबक आणि मजबूत आहे. एवढ्या उंचावर असा तलाव पाहायला मिळणे म्हणजे स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना बघण्यासारखे आहे. पुष्करणी म्हणजे खालच्या पाण्याच्या पातळी पर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या असलेली विहीर. ही पुष्करणी खूप मोठी आणि अत्यंत देखणी आहे, पावसाळ्यात तिच्यातील पाणी अतिशय स्वच्छ आणि नितळ असतं. मी बारावीला जेएसएम कॉलेजला असताना पावसाळ्यात कॉलेजच्या मित्रांसोबत या पुष्करणीत पोहायला आलो होतो, त्यावेळेला पोहायला मनाई किंवा अडवणारे कोणीही नव्हते. चौकोनी पुष्करणीत आजूबाजूच्या झाडावरून उंचावरून सूर मारून डुंबायला दिवस सुद्धा पुरायचा नाही.

गायीच्या मुखाचा आकार कोरलेल्या गायमुखातून सतत पाणी वाहत असते. या गायमुखाची एक प्राचीन कथा अशी ऐकायला मिळते ती अशी, मांडवा गावातील समुद्र किनाऱ्यावर टेकडीच्या पायथ्याशी समुद्रात टाकादेवी देवस्थान आहे, तिथून एक भुयार जाते आणि ते भुयार थेट कनकेश्वर देवस्थानात उघडते आणि त्याचा शोध एका गायीमुळे लागला, एक गाय टाकादेवी देवस्थानाकडे काही ग्रामस्थांनी पाहिली परंतु समुद्राला भरती आल्याने तिला किनाऱ्यावर परतता आले नाही. ती गाय भरती आल्याने टाकादेवी देवस्थानाच्या भुयारात घुसताना ग्रामस्थांनी पाहिले, भरती ओसरल्यानंतर त्यांनी गायीचा शोध घेतला असता त्यांना भुयारात बरेच आत जाऊनसुद्धा ती गाय दिसली नाही की तिचा थांगपत्ता लागला नाही. परंतु दोन दिवसांनी तीच गाय सध्या कनकेश्वर येथे गायमुख आहे तिथे आढळून आली.

या भुयाराचे वास्तव किंवा सत्यता कोणी पडताळून पाहिली नाही परंतु ही काल्पनिक कथा म्हणा, दंतकथा म्हणा किंवा आख्यायिका म्हणा आजही ऐकली जाते.

झिराड गावातून जाणाऱ्या पायवाटेने डोंगराच्या पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत खूप कमी वेळात पोहचता येते.

May be an image of outdoorsकनकेश्वर मंदिरात जाणारी दुसरी किंवा मुख्य पायवाट ही मापगांवातून जाते. या पायवाटेवर बऱ्याच ठीकाणी पायऱ्या आहेत. चढ तीव्र नसला तरी लांब लचक आहे. निसर्गरम्य सृष्टी सौंदर्याची अमर्याद उधळण असलेली ही पायवाट दरवर्षी फक्त शिवभक्तांनाच नाही तर हजारो निसर्गप्रेमींना आकर्षित करते. श्रावणातील कोकणाचे मनोहारी सौंदर्य, धुकं, आणि ऊन पावसाचा खेळ अनुभवयाला आणि ट्रेकिंग करायला सर्वांच्या आवडीचे पर्यटन स्थळ असलेले कनकेश्वर देवस्थान हे अलिबाग करांसाठी एक अलौकिक निसर्गरम्य दैवी वरदानच आहे.

— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनिअर,
B.E.(mech), DIM, DME.
कोन , भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..