नवीन लेखन...

श्रीक्षेत्र नरसोबावाडी

श्रीनरसोबावाडी हे एक परमपावन सुंदर महाक्षेत्र आहे! कृष्णा व पंचगंगा ह्या दोन नद्यांच्या संगमामध्ये एक चौरस मैल क्षेत्रामध्ये बसलेले आहे. हे महाक्षेत्र कृष्णेच्या पश्चिम तीरावर विराजमान असून दोन्ही नद्यांच्या तीरांना हे शोभनीय आहे. कृष्णेच्या एक्कावन पायऱ्यांच्या भव्य घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षातळी सुंदर शीलामय मंदिर आहे. येथे श्रीदत्तात्रेय भगवंतांनी स्वयंभू श्यामसुंदर मनोहर पादुकांचे स्वरूपाने वास्तव्य केले आहे. ते आपल्या भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करीत असतात. त्यांची त्रिकाल पूजा, आरती, महाभिषेक, पालखी मिरवणूक इत्यादि महोत्सव रोज सकाळ ते संध्याकाळपर्यंत चालू असतो. श्रीचे पूजक ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण असून त्यांची सुमारे १५० घरे येथे आहेत.

श्रीक्षेत्र नरसोबावाडी महाराष्ट्र राज्यांत कोल्हापूर जिल्ह्यांत दक्षिण मध्य रेल्वे (साऊथ सेंट्रल रेल्वे मिरज-कोल्हापूर विभागाच्या जयसिंगपूर स्टेशनहून १५ किलोमीटर अंतरावर आहे. स्टेशनपासून नृसिंहवाडीला पुष्कळ बसेस आहेत. नरसोबावाडीमध्ये पोस्ट ऑफीस, दूरवाणी, पोलीस स्टेशन, बँक, मंगल कार्यालये, वेद भवन इत्यादि सर्व सोयी आहेत.

या क्षेत्राचे ठिकाणी वर्षभर यात्रा सुरूच असते. वर्षातील प्रत्येक पौर्णिमेला दत्तदर्शनाला येणाऱ्या वारकरी भक्तांची संख्या पुष्कळ असते. येथे शनिवार हा महत्वाचा दिवस मानला जातो. कारण या क्षेत्राचे अधिपती श्रीगुरु नरसिंह सरस्वती (नरसोबा) यांचा शनिवार हा जन्मदिवस आहे. शनिवारी आठवड्याचे वारकरी येथे खूपच येतात. येथे सर्व प्रकारच्या वस्तु मिळतात. यात्रेकरूंची व्यवस्था येथे चांगली होती. पुजारी लोक आपल्या घरी यात्रेकरूंना नेऊन त्यांच्या इच्छेप्रमाणे दत्तमहापूजा, अभिषेक वगैरेची सर्व व्यवस्था काळजीपूर्वक करतात. कोणतीच उणीव ते पडू देत नाहीत. येथील नरसोबा म्हणजेच ‘श्रीनरसिंह सरस्वती स्वामी’ हा दत्तावतार संन्यासी स्वरूपाचा असल्याकारणाने ह्या क्षेत्रांत संन्याशांना पूज्य मानून त्यांची सर्व प्रकारची व्यवस्था पुजारी आदरपूर्वक करतात. या लहानशा क्षेत्रात कोटी रुपये खर्च करुन श्रीदत्तगुरुंच्या देवळाचे उत्तर ते दक्षिण कृष्णापंचगंगा संगमापर्यंत नवीन घाट बांधले आहेत. त्यामुळे ते दृश्य फारच सुंदर दिसते. त्याकडे अमरेश्वर मंदिरापासून नदीपर्यंत सुंदर घाट बांधले आहेत. दिवसेंदिवस ह्या क्षेत्रात प्रगती होतच आहे.

श्रीदत्तात्रेयांच्या देवालयाचा आकार बादशाही थाटाचा (घुमटे) आहे व श्रीचे पादुकावरील वस्त्रहि त्याच रिवाजाचे आहे. यावरून श्रीगुरुचरित्रांत सांगितल्याप्रमाणे म्लेंच्छादि सर्व जातीचे लोक या ठिकाणी पूज्यभाव ठेवून भक्ति करीत असे वाटते.

दुसरा श्री जनार्दनस्वामींच्या आज्ञेवरून एकनाथ महाराजांनी घाट बांधविला येथे साधु-संतांच्या समाध्या व लहान लहान देवालये आहेत.

१) घाटाचे वर श्रीटेंबेस्वामी मंदिर आहे. २) रामचंद्रयोगी हे दत्तमहाराज वाडीस येणार म्हणून बरीच वर्षे अगोदर येऊन राहिले होते. यांनी जिवंत समाधी घेतली ती इथे आहे. ३) नारायणस्वामी यांचा समाधीकाल शके १७२७ ४) काशीकरस्वामी समाधी काल शके १७४७ ५) गोपाळस्वामी समाधीकाल शके १६५७ यांची जिवंत समाधी आहे. ६) विठोबाचे देवालय यांत कृष्णाबाई, विठ्ठल-रुक्मिणी व लक्ष्मी-नारायण अशा मूर्ती आहेत. ७) मौनीस्वामींनीं बसविलेली उजव्या सोंडेच्या गणपतीची व मौनीस्वामीची मूर्ती आहे. ८) ब्रह्मानंदस्वामी मठ यांत शंकराची पिंडी आहे. स्वामींची समाधी पंढरपुरास आहे. हा मठ श्रीमंत सांगलीकर महाराजांनी बांधला. ९) सांबाचे देवालय हे श्रीचे उजव्या बाजूस असून त्यांत रामाच्या मूर्तीही बसविल्या आहेत. १०) कृष्णाबाई हे देवालय खालच्या पटांगणावर बांधले आहे. या ठिकाणी दरसाल कृष्णावेणीचा उत्सव होतो. ११) मारुती हे देवालय पेठेचे एका टोकास आहे. या ठिकाणी दर वर्षी मारुतीचा जन्मोत्सव होतो. १२) गोविंदपूर – श्रीनारायण स्वामींचे देवळानजीक पिंपळाचा वृक्ष असलेला उंच कट्टा आहे. या कट्ट्यावर देवी, पादुका, गणपति, शंकर वगैरे बरीच लहान- लहान देवळे आहेत. १३) मुख्य स्थानाचें पिछाडीस जान्हवी, अन्नपूर्णा वगैरे आहेत. १४) लोकाश्रयावर तयार झालेल्या वनांत विठ्ठल-रुक्मिणीचे भव्य मंदिर आहे.

अष्टतीर्थ – देवस्थानाच्या उत्तरेस जेथे कृष्णा पश्चिमवाहिनी आहे. तेथे शुक्लतीर्थ असून, स्नानादानादि कर्म केल्याने त्रिविध पाप जाऊन मुक्ती मिळते. पापविनाशतीर्थ, काम्यतीर्थ, सिद्धतीर्थ, (सिद्धवरदतीर्थ) औदुंबरासमोर कृष्णा प्रवाहात आहेत. येथे कृष्णा दक्षिणवाहिनी आहे. या तीर्थात विधियुक्त स्नान, दान, जपादि पुण्य आचरिले असता कामनापूर्ती, सिद्धपणा व इष्ट वरदान मिळते. अमरेश्वर देवासमोर अमरतीर्थ आहे. येथे अमरत्व मिळते. पुढे कोटीतीर्थ आहे. येथे सर्वतीर्थ फलाचा लाभ होतो नंतर शक्तितीर्थ आहे. येथे कायिक, वाचिक, मानसिक, बौद्धिक अशा सर्व प्रकारच्या शक्ति मिळतात. पुढे षट्कुलांत प्रयागतीर्थ आहे. येथे महापातकांचा नाश होतो.

कृष्णा नदीचे पूर्व तीरावरे औरवाड हे गांव आहे. औरवाड येथे पिंपळामध्ये दत्ताच्या पादुका होत्या. त्या ठिकाणी श्रीनरसिंह सरस्वती (दिक्षीतस्वामी) यांनी अमरेश्वर देवालय स्थापन केले आहे. ह्या गावात श्रीगुरु भिक्षेला जात असत. त्या ठिकाणी कृष्णाच्या प्रवाहात अष्टतीर्थ आहेत. तेथे अमरेश्वर देव असल्यामुळे त्या गावाला अमरेश्वर (औरवाड) हे नांव होते.

येथून २ कि.मी. अंतरावर कुरुंदवाड हे गाव आहे. पूर्वी हे संस्थान होते. नरसोबावाडीहून ८ कि.मी. जयसिंगपूर मार्गावर शिरोळ हे गांव आहे. तेथे श्रीगुरुचे भोजनपात्र आहे.

कृष्णा-पंचगंगा संगम म्हणजेच श्री क्षेत्र नरसोबावाडी. ह्या संगमाला श्रीदत्ताची राजधानी असे दुसरे एक नाव आहे. येथे येणारे सर्व भक्तलोक याला श्रीदत्ताचे क्षेत्र असे समजूनच येतात. श्रीदत्तांच्या मनोहर पादुकांची सेवा केल्याने त्यांचे मनोरथ पूर्ण होते. असा सर्वांचा अनुभव आहे. श्री दत्ताने ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ हा दुसरा अवतार धारण केला आणि श्रीनरसिंहसरस्वती हा तिसरा अवतारामध्ये हे बारा वर्षे इथे राहिल्यामुळे ह्याला दत्तवाडी न म्हणता नरसोबावाडी (नरसिंहवाडी) हे नांव पडले.

या दत्तक्षेत्रांत पुजारीवर्गाने सर्व परंपरागत अशी एक सर्वोपकारक वहिवाट चालू ठेवली आहे की, श्रीदत्त महाराजांच्या त्रिकाळ पूजाकाळीच फक्त मंदिरात झांजा किंवा घंटा वाजवावयाची आहे. इतर वेळी वाजवावयाच्या नाहीत, त्यामुळे दत्तपरिसरांत बसून ग्रंथवाचन, जप, ध्यान पूजन इत्यादि अनुष्ठान करणाऱ्या भक्तलोकांना स्वस्थ चित्ताने आपापले चिंतन करण्यांत आनंद वाटतो.

नरसोबावाडीमध्ये यात्रेकरू भक्त, दत्ताला पेढे, खव्याची बर्फी व कवठ्याची बर्फी इत्यादि जिन्नस समर्पण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..