प्रातर्भजामि ललिताभुजकल्पवल्लीं रक्तांगुलीय-लसदंगुलि-पल्लवाढ्याम्।माणिक्य-हेम-वलयांगद-शोभमानां पुण्ड्रेक्षु-चाप-कुसुमैषु-सृणीर्दधानाम्॥२॥
आई ललितांबेच्या मुखकमलाचे स्मरण केल्यानंतर प्रस्तुत श्लोकात पूज्यपाद आचार्य श्री आई जगदंबेच्या हस्त कमलाचे वैभव विषद करीत आहेत. ते म्हणतात,
प्रातर्भजामि- मी सकाळी आराधना करतो, स्मरण करतो. ललिताभुजकल्पवल्लीं- आई ललितांबेच्या हाताचे. जे कल्पवल्ली प्रमाणे आहेत. अर्थात एकदा हा हात मस्तकावर असला की काय वाटेल ते प्राप्त होते. मनात येताच हवे ते मिळते.
रक्तांगुलीय- लाल रंगाच्या अंगठ्या,
लसद्- त्याने चकाकणारी,
पल्लवाढ्याम्- जणू पालवी प्रमाणे अत्यंत सुंदर असणारी.
अंगुली- बोटे.
आई जगदंबेच्या हातातील बोटात लाल रंगाच्या अंगठ्या शोभून दिसतात. लाल सर्वाधिक हा आकर्षक रंग आहे. त्यामुळे अत्यंत आकर्षक अंगठ्या असाही अर्थ होतो.
आईचा हात गोरापान असल्यामुळे त्यावर लाल रंग सुंदर दिसतो त्यामुळे लाल रंगाच्या, असाही अर्थ होतो.
माणिक्य- माणिक नावाच्या लालबुंद रत्नांपासून बनविलेले,
हेमवलय- सोन्याची कंकणे,
अंगद- बाजूबंद, वाकी इत्यादी हातातील अलंकार.
शोभमानां- या सगळ्यांनी आईचे हात शोभून दिसत आहेत. आई ललितेचे स्वरूप चतुर्भुज असते. या चार हातांमध्ये,
पुण्ड्रेक्षु- लाल रंगाचा ऊस.
चाप- धनुष्य
कुसुमैषु- इषु म्हणजे बाण. फुलांचे बाण.
सृणी:- अंकुश.
दधानाम्- धारण करणाऱ्या, या हातांचे मी स्मरण करतो.
आईला चार हात आहेत. अर्थात धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ आईच्या हातात आहेत.
यात रसपूर्ण फल देणारा ऊस धर्माचे, पराक्रमाची माध्यम असणारे धनुष्य अर्थाचे, फुलांचे बाण हे कामाचे तर आत्म नियमनकारी अंकुश हे मोक्षाचे प्रतीक आहे.
या चारही गोष्टी आईच्या हातात आहेत.
आपल्या भक्तांना हे सर्व देते म्हणून त्या हातांचे स्मरण.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply