प्रातर्नमामि ललिताचरणारविन्दं भक्तेष्टदाननिरतं भवसिन्धुपोतम्।पद्मासनादि-सुरनायक-पूजनीयं पद्मांकुश-ध्वज-सुदर्शन-लांछनाढ्यम्॥३॥
यानंतर पूज्यपाद जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज आई ललितांबेच्या चरणकमलांचे वंदन करीत आहेत. त्यांचे वर्णन करीत आहेत.
प्रातर्नमामि- मी रोज सकाळी वंदन करतो. ललिताचरणारविन्दम्- आई जगदंबेच्या, श्रीललितेच्या चरणकमलांना.
कशी आहेत ही चरणकमले?
भक्तेष्टदाननिरतम् – भक्तांना इष्ट म्हणजे योग्य ते प्रदान करणारे.
यातील इष्ट शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. इष्ट म्हणजे योग्य ,चांगले ,समर्पक. आई जगदंबेच्या चरणाशी योग्य तेच मिळते. आपल्याला हवे ती नाही. कारण अनेकदा आपल्याला जे हवे असते ते आपल्यासाठी योग्य नसते. मात्र आईला नेमके समजते की आपल्या बाळाला काय योग्य आहे? आई ललितांबेचे चरण साधकांना इष्ट ते प्रदान करतात.
भवसिन्धुपोतम्- हे चरण साधकांच्या साठी, भव म्हणजे संसार, सिंधू म्हणजे सागर, पार करण्यासाठी साधन असणारी, पोतं म्हणजे नाव,बोट ठरत असतात.
पद्मासनादि- आईची ही चरणकमले कमळावरच स्थापित असतात.
सुरनायक पूजनीयम्- सुर म्हणजे देवता. त्यांचे नायक अर्थात देवराज इंद्र. त्यांच्या द्वारे पूजन केल्या गेलेले.
अशा त्या आईचा सुंदर चरणकमलांवर असणाऱ्या चिन्हांची सूची देतांना आचार्यश्री म्हणतात, पद्म- कमळ
अंकुश,ध्वज,सुदर्शन अर्थात चक्र यांच्या लांछन- अर्थात चिन्हांनी
आढ्यम्- अर्थात सर्वश्रेष्ठ ठरणारी ती आईची चरणकमले मी प्राप्त काळी वंदितो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply