श्री विनायक, श्रीमयुरेश्वर, श्री गजानन, श्रीशेषात्मज, श्री पुष्टीपती, श्री उमांगमलज, श्री चतुर्भुज, श्री शूर्पकर्ण,
श्री ढुंढिराज, श्रीवल्लभेश , श्री पंचकन्यापती. ही केवळ गणपतींच्या नावांची सूची वाटली ना? पण हे सर्व आहेत श्री गणेशांचे वेगवेगळे अवतार!
श्रीगणेश अवतारलीला १ – श्रीमयुरेश्वर अवतार
त्रेतायुगामध्ये झालेल्या सिंधू नामक दैत्याच्या त्रासाने कैलास सोडलेले भगवान शंकर आणि देवी पार्वती महर्षी गौतम यांच्या आश्रमामध्ये त्रिसंध्या क्षेत्राला राहू लागले. यालाच सध्या आपण त्रंबकेश्वर असे म्हणतो.
येथे भगवान शंकरांना ध्यानरत पाहिल्यावर देवी पार्वतीने प्रश्न केला की आपण महादेव असून कोणाचे ध्यान करता?
त्यावर भगवान शंकरांनी तिला गणेश तत्त्वज्ञान समजावून सांगितले. देवी पार्वतीने गणेश साक्षात्काराचा मार्ग विचारला. त्यावर शंकरांनी तिला गणेश एकाक्षरी मंत्राचा उपदेश करून तपश्चर्येचा आदेश दिला.
लेखनाद्री अर्थात सध्याच्या लेण्याद्रीवर देवी पार्वतीने गणेश आराधना केली. तपाने प्रसन्न झालेल्या भगवान गणेशांना पुत्र रूपात घरी येण्याची विनंती केली.
श्री गणेशांनी तथास्तु म्हटल्यावर आनंदाने परत येऊन तिने ती आनंद वार्ता भगवान शंकरांना सांगितली.
बराच काळ वाट पाहिल्यानंतर सुद्धा भगवान गणेश अवतार घेत नाहीत म्हंटल्यावर श्रीशंकरांनी देवी पार्वतीला श्री गणेश पार्थिव परत करण्याचा सल्ला दिला.
श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असा एक महिना तिने पार्थिव गणेश पूजन केले.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्याह्न समयी या पार्थिव गणेशमूर्ती तूनच प्रकटलेला भगवान गणेशांचा अवतार म्हणजे श्रीमयुरेश्वर.
या अवतारात भगवान सहा हातांचे होते. मोरावर बसलेले असल्याने त्यांना मयुरेश्वर असे म्हणतात.
अनेक राक्षसांच्या विनाशाच्या बाललीला, महर्षी गौतमां समोर आणि देवी पार्वती समोर प्रकट केलेले भक्तीचे रहस्य, मयूर वाहन स्वीकार, नागकन्यांचा उद्धार, कमलासुर तथा सिंधू दैत्याचा विनाश या अवतारातील विशेष लीला होत.
देवी पार्वतीच्या पार्थिव पूजनातून आज भगवान प्रगटले असल्याने आज मोरयाच्या मातीच्या मूर्तीच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे.
श्रीमयुरेश्वर अवताराची आजची प्रगटतिथी भाद्रपद शुद्ध चतुर्थी.
जय श्री मयुरेश्वर !
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply