निजे भूस्वानंदे जडभरतभूम्यां परतरे !
तुरीयायास्तीरे परमसुखदे त्वं निवससि!
मयुरायानाथस्त्वमसच मयूरेश भगवन् !
अतस्त्वां संध्याये
शिवहरीरविब्रह्मजनकम् !
श्रीक्षेत्र मोरगाव चे आणि भगवान श्री गणेशांचे अद्वितीय वैभव एका श्लोकात सादर करणारी ही महागाणपत्य श्रीअंकुशधारी महाराज यांची रचना.
यातील शेवटची ओळ सगळ्यात महत्त्वाची आहे. गाणपत्य संप्रदायानुसार, श्री मुदगल पुराणानुसार भगवान श्रीगणेश हे ना शिवपुत्र आहेत ना पार्वतीनंदन. उलट परब्रह्म, परमात्मा, निर्गुण, निराकार, ओंकाररूप श्री गणेश शिव,हरी, रवि, ब्रह्म जनक आहेत.
भगवान गणेशांचे हे सर्वपूज्यत्व आपल्याला विविध क्षेत्रांवर पहावयास मिळते.
भगवान श्री शंकरांनी स्थापिलेले श्री क्षेत्र रांजणगाव, भगवान श्री विष्णूंनी तपस्या केलेले श्रीक्षेत्र सिद्धटेक, भगवान ब्रह्मदेवांची तपोभूमी श्रीक्षेत्र थेऊर, देवी पार्वतीची आराधना क्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री, भगवान श्री सूर्य स्थापित श्री हेरंब गणेश श्रीक्षेत्र काशी अशा रुपात पंचेश्वरांनी केलेली गणेशोपासना पाहता येते.
यासह भगवान इंद्र कळंब, भगवान चंद्र गंगामसले, भगवान शनि पैठण, भगवान यम नामलगाव, भगवान स्कंद वेरूळ, भगवान दत्तात्रय राक्षसभुवन अशी सर्व देवतांनी गणेशोपासना केल्याची स्थाने विद्यमान आहेत.
भगवान विष्णूंच्या अवतारात वामन आणि श्रीक्षेत्र आदासा, श्री परशुरामांनी श्रीक्षेत्र माहूर, श्रीरामांनी श्रीक्षेत्र हम्पी, भगवान श्रीकृष्णांनी पुणे जिल्ह्यातील सुपे आणि यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे गणेश विग्रह स्थापन केले आहेत.
या सर्व क्षेत्रांच्या कथा देणारे श्री मुदगल पुराण भगवान गणेशांच्या या सर्वपूज्य, सर्वादिपूज्य स्वरूपाला आपल्यासमोर वेगवेगळ्या अंगानी प्रस्तुत करते.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply