परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेशांच्या निर्गुण निराकार स्वरूपाचे विविध अंगाने स्पष्टीकरण करणाऱ्या श्रीमुद्गलपुराणाच्या निर्मितीचा इतिहासही मोठा अलौकिक आहे.
एकदा स्वर्गातील एका उत्सवात भगवान ब्रह्मदेवांचे पुत्र दक्षा प्रजापती चा प्रवेश झाला. महाराज दक्ष सर्व प्रजापतीचे प्रमुख आहेत. त्यांचा अधिकार महेश्वर तुल्य वर्णिला आहे. पण या अद्वितीय अधिकाराचाच दक्षाला गर्व झाला. त्या गर्वाने फुललेले दक्ष तेथे आले.
त्यांच्या आगमना सोबत सर्व सभा उठून उभी राहिली. पण तिघे जण उठले नाहीत. नेमकी ही गोष्ट देवर्षी नारदांनी पकडली आणि दक्षाच्या अहंकाराचा विनाश करण्यासाठी त्यांनी वेगळीच लीला केली.
दक्षाच्या कानाशी जाऊन देवर्षी नारद म्हणतात, आपणाला सर्व उठून उभे राहिले. आपला तो अधिकारच आहे. पण तिघे जण उठले नाहीत. त्यातील ब्रह्मदेव उठले नाही तर वाईट नाही कारण ते आपले पिताश्री आहेत. श्री विष्णू उठले नाही तरी हरकत नाही. कारण ते त्यांचे पिताश्री आहेत. पण शंकर तर आपले जावई आहेत ना? त्यांनी उठायला नको का?
समाधीमग्न असणाऱ्या भगवान शंकरांच्या न उठण्याला आपला अपमान समजणाऱ्या दक्षाने वाटेल तशी शिव निंदा केली.
त्यावर संतापलेल्या नंदीने त्यांना शाप दिला. दक्षाने नंदीला शाप दिला.
पण शंकरांचा राग डोक्यात बसलेल्या दक्षाने नारदांच्याच सांगण्यावरून शंकरांचा अपमान करण्यासाठी त्यांना न बोलावता एक यज्ञ सुरु केला.
देवर्षी नारदांनी ही बातमी जाऊन दक्षकन्या सती ला सांगितली. सती त्या यज्ञात आली. तेथे पुन्हा दक्षाने शिवनिंदा केली. परिणाम रूपात सतीने स्वतःला दक्ष यज्ञात जाळून घेतले.
देवी सतीच्या जाण्याने भयंकर संतप्त झालेल्या भगवान शंकरांनी संपूर्ण दक्षयज्ञाचा विध्वंस केला.
शेवटी सर्व देवतांनी विनंती केल्यावरून प्रसन्न झालेल्या श्रीशंकरांनी दक्षाला उठवण्यासाठी अद्भुत लीला केली. वीरभद्र नामक गणाने दक्षाचे मस्तक कापून जाळून टाकले होते. त्यामुळे त्याच्या जागी दक्षाला बोकडाचे मस्तक बसविण्यात आले.
पुराणात आलेली अशी वर्णने शांतपणे समजून घ्यायला हवीत.यात तो प्राणी महत्त्वाचा नसतो तर त्या प्राण्यांचे गुणधर्म महत्त्वाचे असतात.
दक्षाचे मस्तक बोकडाचे आहे याचा अर्थ काय? तर त्यासाठी बोकडाचा आवाज समजून घ्यावा लागेल. बोकडाचा ध्वनी मे मे असा असतो. मे हा संस्कृत मध्ये मला आणि माझे या अर्थाचा शब्द.
दिवसभर मला, मला आणि माझे, माझे करणारा प्रत्येक अज्ञानी जीव मे मे करतो. या अर्थाने बोकड असतो.
अज मस्तक झाल्यामुळे दक्ष प्रजापती आपल्या पूर्व ज्ञानाला विसरले. त्यांना ते ज्ञान पुन्हा मिळवून देण्यासाठी महर्षी मुद्गलांनी केलेला दिव्य उपदेश आहे श्री मुद्गल पुराण.
सोप्या शब्दात आपल्यासारख्या सर्व मे मे करणाऱ्या आत्मविस्मृत जीवांच्या उन्नतीचा राजमार्ग आहे श्रीमुद्गलपुराण.
(क्रमशः)
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply