महर्षी मुद्गलांनी दक्षप्रजापतींना दिलेला दिव्य उपदेश म्हणजे श्रीमुद्गलपुराण. महर्षी मुद्गल यांनी सांगितले म्हणून त्याला मुद्गल पुराण असे म्हणतात.
महर्षींचे हे नावच किती सुंदर आहे पहा. श्री मुदगल.
मुद शब्दाचा अर्थ आनंद. बाहेरून पंचज्ञानेंद्रियांनी मिळणाऱ्या संवेदनांचा नाही तर आपला आनंद. तो आपला स्वतःचा स्वाधीन असणारा आनंद म्हणजे मुद. तर गल शब्दाचा अर्थ आहे ओसंडून वाहणे. अर्थात ज्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांच्या आतला आनंद ओसंडून वाहतो ते मुद्गल.
सामान्यतः ऋषीमुनी स्वतः बद्दल बोलत नाहीत. पण महर्षी मुद्गलांनी स्वतःच्या पूर्वायुष्याबद्दल राजा दक्षाला सांगितले आहे.
महर्षी मुद्गलांच्या दिव्य तपामुळे त्यांना घेण्याकरता स्वर्गातील विमान आले. देवदूतांनी प्रार्थना केल्यावर महर्षी मुद्गल म्हणतात मी स्वर्गात यावे असे स्वर्गात काय आहे? देवदूतांनी स्वर्गाचे विस्तृत वर्णन केले. महर्षी मुद्गल यांनी पुढचा प्रश्न विचारला मी स्वर्गात येऊ.नये असे स्वर्गात काय आहे? देवदूत ही गोंधळले. हा प्रश्नच आजपर्यंत कोणी विचारला नव्हता.
त्यांनी विचार केला आणि सांगितले की स्वर्गात तीन दोष आहेत.
एक स्वर्गात देखील तुमच्या पुण्या नुसार तुमचे स्तर असतात. त्यानुसारच तुम्हाला भोग मिळतात.
दुसरा म्हणजे ज्या क्षणी तुमचे पुण्य संपेल त्या क्षणी तुम्हाला पुन्हा पृथ्वीवर पाठवले जाते. क्षणभरही वाढवून मिळत नाही.
तसेच तिसरा दोष म्हणजे स्वर्ग ही भोगभूमी आहे. तेथे तुम्हाला पुण्य कर्म केले तर त्याचे फळ मिळत नाही.
या तीन गोष्टी ऐकल्या आणि देवदूतांना सादर वंदन करून महर्षी मुद्गल म्हणाले मला तुमच्या स्वर्गात येण्यात स्वारस्य नाही. आपण परत जावे.
जेथे केलेल्या पुण्यकर्माचे फळ मिळत नाही, जी केवळ भोगभूमी आहे तेथे जाण्यापेक्षा या योग भूमी असणाऱ्या भारतात राहणे मला अधिक आनंददायी आहे.
ईश्वरी उपासनेचा आनंद देणाऱ्या या भारताला स्वर्ग पेक्षाही श्रेष्ठ मांडणाऱ्या महर्षी मुद्गलांनी आयुष्याचा स्वर्ग करण्याचा दिलेला राजमार्ग आहे श्रीमुद्गलपुराण.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply