श्री मुदगल पुराणात वर्णिलेल्या या आठही राक्षसांची नावे किती वेगळी आहेत ते आपण पाहिले. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व राक्षस कोणत्यातरी देवते पासून किंवा ऋषी पासून जन्माला आले आहेत.
या वाक्याचा दुसरा अर्थ असा की ते त्यांच्यात होते. कोणत्याही गोष्टीतून तीच गोष्ट निर्माण होऊ शकते जी त्या गोष्टीत मूलतः अस्तित्वात असते. विष्णु, शंकरादिक देवतां पासून कामक्रोधादिक दैत्य जन्माला येत असतील तर याचा अर्थ ते विकार त्यांच्यातही आहेत हेच सिद्ध होते. केवळ मुद्गल पुराणात नव्हे तर अन्य पुराणात देखील वर्णन केलेल्या मोहिनी कथा, वृंदा कथा इ. मध्ये आपल्याला देवतांच्या त्या त्या वेळी त्या त्या विकारांनी ग्रस्त झाल्याच्या कथा पाहायला मिळतात. याचा अर्थ हे विकार देवतानाही सुटले नाहीत. मग आपले कसे सुटतील?
श्री मुदगल पुराणाला नेमका हाच भाव व्यक्त करायचा आहे की हे विकार सुटणे संभवतच नाही.
यातील एकही विचार नष्ट होतच नसतो. हे दाखविण्याची श्री मुद्गल पुराणाची अत्यंत सुंदर शैली म्हणजे या संपूर्ण पुराणात एकाही राक्षसाचा वध नाही. हे राक्षस अवध्य आहेत.
मग यांचे नेमके करायचे काय? तर याच अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर आहे श्री मुदगल पुराण.
श्री मुद्गल पुराण सांगते की हे सर्व विकार आपल्याला “सह-ज” रूपात मिळाले आहेत. अर्थात हे सर्व विकार जन्मापासून आपल्यासोबत आहेत. खरेतर जन्माच्या आधीपासून सोबत आहेत. या विकारांनी, या वासनांनी युक्त असल्यामुळे जन्माला यावे लागते असे शास्त्र सांगते.
काम सोडा, क्रोध सोडा, मोह सोडा हे सांगायला खूप सोपे आहे. पण हे संभव आहे का? सांगणेवाल्याचे तरी सुटले आहेत का? तर निश्चित नाही.
मग यांचे करायचे काय? तर मुद्गल पुराण सांगते,भगवान गणेश या सर्व राक्षसांची सेना नष्ट करतात. शेवटी राक्षस शरण येतो.
अगदी याच पद्धतीने ही कामक्रोधादिक विकारांची रचना ज्या ज्या साधनांनी वाढते ते त्यांचे सैन्य नष्ट करणे आपल्या हातात आहे. उदाहरणार्थ ज्या गोष्टीने क्रोध येतो त्या गोष्टीपासून दूर राहणे.
अशा रीतीने या विकारांना हत-बल केले की मग ते शरण येतात. मग त्यांना भगवत भक्तीत परिवर्तित करता येते.
म्हणजे कामनाच वाटायची तर ती ईश्वरी भजनाची वाटावी. अशा रीतीनेच या शरणागतांना हाताळता येते. हाच मुद्गल पुराणाचा प्रमुख बोध आहे.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply