या विकारांच्या त्रासातून वाचण्याचे जे विविध उपाय श्रीमुद्गलपुराणाने दिलेले आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे चतुर्थी.
श्री मुद्गल पुराणाचा चौथा खंड चतुर्थी वर्णनाला समर्पित आहे. बारा महिन्यात येणाऱ्या प्रत्येकी दोन अशा चोवीस आणि अधिक मासातील दोन अशा सव्वीस चतुर्थीच्या प्रत्येकी दोन अशा बावन्न कथा तेथे पाहावयास मिळतात.
केवळ वरपांगी वाचत गेला तर या कथा विचित्र वाटतील हे आधीच सांगून ठेवतो.
मुळात या कथा दोन प्रकारच्या असतात. विधी कथा आणि निषेध कथा. विधी कथा म्हणजे हे व्रत केल्याने हे हे फायदे होतात म्हणून हे व्रत करावे. असे सांगणाऱ्या कथा. तर निषेध कथा म्हणजे हे व्रत न केलेल्यांचे हे हे नुकसान झाले. तुमचे होऊ नये असे वाटत असेल तर हे व्रत करा. दोन्हीतही ती कथा महत्त्वाची नसते तर हे व्रत करा हा भाव महत्त्वाचा असतो.
व्रताच्या आणि त्या व्रतात केल्या जाणाऱ्या ईश्वरी उपासने च्या माध्यमातून आपल्या सकल दुःखांना कारणीभूत असणारे काम क्रोधादिक विकार शांत करणे. किमान त्यांचा प्रभाव कमी करणे हा मूळ उद्देश असतो.
तुम्ही म्हणाल याचा व्रताशी संबंध काय? तर लक्षात घ्या व्रताचे पहिले दोन नियम आहेत काही खायचे नाही. काही बोलायचे नाही.
एकदा खाण्यावर नियंत्रण आले की त्यात खाण्यातून म्हणजे अन्नातून निर्माण होणाऱ्या आपल्या अन्नमय कोशावर, देहावर नियंत्रण मिळवता येते. वाणीवर नियंत्रण आले की अनेक विकार आपोआपच नियंत्रित होतात.
या कथांमध्ये अनेकदा आपल्याला अशा कथा मिळतात की नकळत घडलेल्या व्रताने एखादा कसा मुक्त झाला. अशा कथांचा मूळ अर्थ असतो की त्याला नकळत घडून फायदा झाला आपण समजून उमजून केले तर किती होईल?
समजून व्रत करायचे म्हणजे काय? तर त्यात केवळ तोंडाने न खाणे हाच विषय नाही. आपण जसे तोंडाने अन्नग्रहण करतो, तसे डोळ्याने दृश्य, कानाने वाक्य देखील ग्रहण करतो. या सगळ्यांना नियंत्रित केले की मग कामादिक विकारही नियंत्रित होतात. यासाठी केलेले प्रयास म्हणजे खरी चतुर्थी.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply