श्री मुद्गल पुराण आता चौथा खंड जसा चतुर्थी वर्णनाला समर्पित आहे, तसाच सहावा खंड श्रीक्षेत्र मोरगावच्या वर्णनाला समर्पित आहे.
भगवान श्री गणेशाच्या निवासस्थानाला “स्वानंद” असे म्हणतात. श्रीक्षेत्र मोरगाव चे महत्व एकाच शब्दात सांगायचे तर त्याला “भूस्वानंद” म्हणतात. अर्थात पृथ्वीवरचा स्वानंद. भगवान श्री गणेशांचे प्रत्यक्ष निवासस्थान.
श्री मुदगल पुराणाने वर्णिलेल्या अष्टविनायकांची मूळ स्थाने भारताच्या आठ दिशेला आठ आहेत. विशेष म्हणजे श्रीक्षेत्र मोरगाव येथे मोरयाच्या मंदिरात आठ दिशांना या आठ विनायकांच्या मूर्ती स्थापित आहेत. भगवान श्रीमयुरेश्वर यांच्या पूजनानंतर पूर्वेकडून अनुक्रमे भगवान श्री वक्रतुंड, श्री एकदंत, श्री महोदर, श्री गजानन, श्री लंबोदर, श्री विकट,श्री विघ्नराज आणि श्री धूम्रवर्ण अशा या आठ विनायकांची पूजन करायचे असते. वेगळ्या शब्दात एकाच मंदिरात संपूर्ण भारताची यात्रा करण्याची सुविधा आहे श्रीक्षेत्र मोरगाव.
या अष्टविनायकांच्या सह भगवान श्री गणेशांच्या परिवारातील समस्त देवतांच्या मूर्ती येथे विराजमान आहेत. या सगळ्यांची नित्य पूजन करण्याचे विधान येथे आहे. याला नित्ययात्रा असे म्हणतात.
श्रीक्षेत्र मोरगाव च्या चार बाजूला धर्म अर्थ काम आणि मोक्ष ही चार द्वारे असून रमा रमेश अर्थात लक्ष्मी नारायण, उमा महेश अर्थात पार्वती शंकर, रती मदन आणि आदिशक्ती तसेच मही वराह आणि श्री सूर्य अशा देवता तेथे असतात. त्यास हो मार्गातील देवतांच्या क्रमबद्ध पूजनाला द्वार यात्रा असे म्हणतात.
ब्रह्मकमंडलू नावाच्या गंगेच्या किनाऱ्यावर हे क्षेत्र विद्यमान आहे तिला सामान्य भाषेत कऱ्हा नदी असे म्हणतात.
भगवान श्री गणकाचार्यांपासून सुरू झालेल्या परंपरेतील श्री गणेश योगींद्राचार्यांनी कलियुगात पुढे चालवलेली योगींद्र मठाची परंपरा आणि चिंचवड येथील महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांची परंपरा या दोन्ही गाणपत्य परंपरा यांच्या दृष्टीने सर्वोच्च स्थान आहे, श्री मुदगल पुराण वर्णित श्रीक्षेत्र मोरगाव.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply