श्री गणेश अवतारलीला १० – श्री पंचकन्यापती गणेश
श्री मुदगल पुराणाच्या चौथ्या खंडातील सहाव्या अध्यायात एक सुंदर कथा आली आहे.
एकदा काही देव आणि ऋषींनी एकत्र येऊन विचार केला की जर विष्णु, शंकर इत्यादी सर्व देवता परमेश्वर आहेत, तर आरंभी गणेशपूजनच का करायचे? आपण आपल्या इष्ट देवतेचे पूजन करू. त्यांनी तसा प्रयोगही केला.
त्यावेळी तेथे भयानक आवाजासह सगळ्यांना धडकी बसावी असे एक अक्राळविक्राळ रूप प्रगटले. सर्वजण घाबरले. त्यांनी आपल्या इष्ट देवतेचे स्मरण केले. पंचेश्वर तेथे प्रगट झाले. या संकटाचा सामना करता येत नाही म्हटल्यावर सगळ्यांनी मिळून त्या रुपाची स्तुती केली. शेवटी तेथे भगवान श्रीगणेश प्रकट झाले.
त्यावेळी भगवान ब्रह्मदेवांनी सरस्वती, श्री विष्णूंनी पुष्टी, श्री शंकरांनी योगिनी, देवी आदिशक्तीने मोहिनी आणि भगवान श्री सूर्यांनी संजीवनी नामक कन्येला निर्माण करून आपल्या या कन्या भगवान गणेशांना समर्पित केल्या. या पाच कन्यांशी विवाह केल्याने श्रीगणेशांना पंचकन्यापती गणेश म्हणतात.
या पाच जणींच्या नावातच आपल्या लक्षात येते की ही त्या त्या देवतेची शक्ती आहे. जसे आदिशक्तीचे कार्य आहे सर्व जगाला मोहित करणे म्हणून तिची शक्ती मोहिनी. त्यांना कन्या समजून ते गणेशांना अर्पण करतात.
जशी एखाद्या पित्यासाठी कन्या त्याच्या आनंदाचा विषय असली, तिच्या लीलांनी तो प्रसन्न होत असला तरी शेवटी ती कोणाची तरी असते. त्याप्रमाणे या देवतांच्या जवळ असणाऱ्या शक्तींचा त्यांना आनंद मिळत असला तरी शेवटी सर्व शक्ती परमशक्ती संपन्न, ॐकारब्रह्म, भगवान गणेशांच्याच आहेत. हे सांगण्याची पुराणाची स्वतःची पद्धती आहे पंचकन्यापती गणेश.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply