नवीन लेखन...

श्रीरामभुजंगस्तोत्र – मराठी अर्थासह

श्रीरामभुजंगस्तोत्र हे श्रीरामाचे आदि शंकराचार्यांनी रचलेले स्तोत्र समजण्यास खूप सोपे व त्यामुळे भाविकांच्या मनाला भिडणारे आहे. समर्थ रामदासांच्या वाङ्मयामुळे व रामदासी संप्रदायामुळे महाराष्ट्रात रामभक्तांचे प्रमाण मोठे आहे. त्यांना हे स्तोत्राचे मराठी रूपांतर आवडेल अशी खात्री आहे.

या स्तोत्राची रचना ‘ भुजंगप्रयात ’ (यमाचा यमाचा यमाचा यमाचा) या वृत्तात केली असल्याने त्याला    ‘ रामभुजंगम् ’ असे नाव दिले आहे. अपवाद श्लोक २२ चा. तो रथोद्धता वृत्तात (राधिका नमन राधिका लगा) आहे.


विशुद्धं परं सच्चिदानन्दरूपम्
गुणाधारमाधारहीनं वरेण्यम् ।
महान्तं विभान्तं गुहान्तं गुणान्तं
सुखान्तं स्वयंधामरामं प्रपद्ये ॥ १ ॥

मराठी- जो सर्वाधिक शुद्ध आहे, सर्वश्रेष्ठ आहे, आस्तित्वस्वरूप, प्रज्ञास्वरूप व आनंदस्वरूप आहे, जो सर्व सद्गुणांचा साठा आहे, ज्याला कोणाच्याही आधाराची आवश्यकता नाही, जो सर्वांना पूज्य आहे, महान आहे, त्रिगुण ज्याचे ठायी लीन होतात, आधिभौतिक सुखांपासून जो दूर आहे, जो स्वयंपूर्ण आहे, अशा रामाला मी शरण जातो.

झळाळे गुणी श्रेष्ठ वाटे हवासा
मती मोद आस्तित्वरूपात खासा ।
सुखापासुनी दूर, ज्या मोह नाही
स्वयंपूर्ण श्रीराम,  मी नम्र ठायी ॥ ०१


शिवं नित्यमेकं विभुं तारकाख्यं
सुखाकारमाकारशून्यं सुमान्यम् ।
महेशं कलेशं सुरेशं परेशं
नरेशं निरीशं महीशं प्रपद्ये ॥ २ ॥

मराठी – जो कल्याणकारी आहे, एकमेवाद्वितीय आहे, शक्तिमान राजा आहे, जो निराकार आहे, सर्वांना सुखकारक आहे, सर्वव्यापी आहे, सर्वांना पूजनीय आहे, देवामध्ये थोर, सर्व कला पारंगत, देवांचा राजा परमेश्वर, जनतेचा राजा, ज्याच्यापेक्षा मोठा कोणीच नाही, अशा पृथ्वीचा राजा श्रीरामाला मी शरण जातो.

प्रजाहीतकारी सदा, भूप, त्राता
निराकार, दे सौख्य, लोकेश शास्ता
कलाकार, मोठा दुजा भूप नाही
शुची एकला पूज्य, मी नम्र ठायी ॥ ०२     (शुची- श्रीराम)


यदावर्णयत्कर्णमूलेऽन्तकाले
शिवो राम रामेति रामेति काश्याम् ।
तदेकं परं तारकब्रह्मरूपं
भजेऽहं भजेऽहं भजेऽहं भजेऽहम् ॥ ३ ॥

मराठी- काशीनगरीत मृत्युसमयी (भक्ताच्या) कानात (स्वतः) भगवान शंकरांनी ज्याचे ‘राम राम राम’ असे नाव उच्चारले, त्या एकमेव श्रेष्ठ (या संसारसागरातील) तारणहार ब्रह्माची मी आराधना करतो.

कुणी भक्त काशीत प्राणांत झाला
स्वतः शंभु ‘हे राम’ कानी म्हणाला ।
परब्रह्म त्राता असा शेष-भ्राता
नमस्कार, पूजार्चना त्यास आता ॥ ०३

टीप- लक्ष्मण हा शेषाचा अवतार असल्याने शेषभ्राता हा शब्द श्रीराम या अर्थी वापरला आहे.


महारत्नपीठे शुभे कल्पमूले
सुखासीनमादित्यकोटिप्रकाशम् ।
सदा जानकीलक्ष्मणोपेतमेकं
सदा रामचन्द्रम् भजेऽहं भजेऽहम्  ॥ ४ ॥

मराठी- मौल्यवान रत्नजडित सिंहासनावर बसलेल्या, पवित्र कल्पवृक्षाखाली सुखासनात आसनस्थ असणार्‍या, कोट्यवधी सूर्यांप्रमाणे तेजस्वी असलेल्या, सीता आणि लक्ष्मण ज्याच्याबरोबर नेहेमी असतात अशा श्रीरामाची मी नित्य भक्ती करतो.

तळी पुण्य कल्पद्रुमा बैसलासे
हिरे जोडिले आसनी सर्व खासे ।
प्रभा सूर्य कोटी, सवे बंधु जाया
सदा पूजितो मी प्रभू रामराया ॥ ०४


क्वणद्रत्नमञ्जीरपादारविन्दम्
लसन्मेखलाचारुपीताम्बराढ्यम् ।
महारत्नहारोल्लसत्कौस्तुभाङ्गं
नदच्चंचरीमंजरीलोलमालम् ॥ ५ ॥ ………

मराठी- ज्याच्या पदकमलांमधील वाळे किणकिण नाद करतात, जो सुरेख पीतांबर व झळाळणारी कंबरेची साखळी ल्याला आहे, ज्याच्या वक्षावर उत्कृष्ट रत्नांच्या हारातील कौस्तुभ मणी झळकत आहे, ज्याच्या गळ्यातील हारातील फुलांवर भुंगे गुंजन करीत आहेत ………

घुमे नाद पादांबुजी रत्न वाळे
कटीमेखला पीत शेला झळाळे ।
उरी शोभते कौस्तुभासंग माला
फुले पुष्पमाला अली गुंजनाला ॥ ०५         (अली- भुंगा)


लसच्चन्द्रिकास्मेरशोणाधराभम्
समुद्यत्पतङ्गेन्दुकोटिप्रकाशम् ।
नमद्ब्रह्मरुद्रादिकोटीररत्न-
स्फुरत्कान्तिनीराजनाराधितान्घ्रिम् ॥ ६ ॥

मराठी-  ज्याच्या लाल ओठांवर चंद्राच्या आभेप्रमाणे मंद हास्य खेळत आहे, उगवत्या कोट्यवधी सूर्य-चंद्राप्रमाणे ज्याचे तेज आहे, नमस्कार करणार्‍या ब्रह्मा, रुद्र इत्यादींच्या कोट्यवधी रत्नांच्या चमकदार तेजाने ज्याच्या पावलांची आरती होते…………

जणू कौमुदी लाल ओठी विलासे
शशी-सूर्य कोटी जसे तेज खासे ।
विरंची पिनाकी स्वतः नम्र होती
हिर्‍यांच्या दिव्यांनी पदा पूजिताती ॥ ०६


पुरः प्राञ्जलीनाञ्जनेयादिभक्तान्
स्वचिन्मुद्रया भद्रया बोधयन्तम् ।
भजेऽहं भजेऽहं सदा रामचन्द्रं
त्वदन्यं न मन्ये न मन्ये न मन्ये ॥ ७ ॥

मराठी- ज्याने आपल्या समोर ओंजळ पसरून उभ्या हनुमान आणि इतर भक्तांना कल्याणकारी ज्ञानमुद्रेत बसून (ब्रह्मविद्येचा) उपदेश केला त्या रामचंद्राला मी नित्य भजतो. तू सोडून इतर कोणाचाही मी विचार करत नाही.

समोरी उभ्या मारुती, अन्य भक्तां
स्वतः ज्ञानमुद्रेत सद्बुद्धि दाता ।
तया रामराया सदा पूजितो मी
तुझ्यावीण माझा नसे अन्य स्वामी ॥ ०७


यदा मत्समीपं कृतान्तः समेत्य
प्रचण्डप्रतापैर्भटैर्भीषयेन्माम् ।
तदाविष्करोषि त्वदीयं स्वरूपं
तदापत्प्रणाशं सकोदण्डबाणम् ॥ ८ ॥

मराठी- जेव्हा (मृत्युसमयी) यमराज त्याच्या अत्यंत शूर सैनिकांसह मला घाबरवील, तेव्हा तू तुझे संकटांचा नाश करणारे धनुष्यबाण हाती घेतलेले रूप प्रकट करतोस.

बहू शूर वीरां सवे काळ येई
मला भीति दावी, तदा तूच घेई ।
खरे आपुले रूप कोदंडधारी
करी नष्ट जे संकटांना विखारी ॥ ०८


निजे मानसे मन्दिरे संनिधेहि
प्रसीद प्रसीद प्रभो रामचन्द्र ।
ससौमित्रिणा कैकेयीनन्दनेन
स्वशक्त्यानुभक्त्या च संसेव्यमान ॥ ९ ॥

मराठी- लक्ष्मण आणि भरत यथाशक्ती आणि भक्तिभावाने ज्याची सेवा करतात अशा प्रभू रामचंद्रा, तू माझ्यावर प्रसन्न हो, प्रसन्न हो. माझ्या मनमंदिरात वास कर.

मनोमंदिरी वास माझ्या करावा
सवे मांडवीनाथ सौमित्र व्हावा । (मांडवीनाथ- मांडवीचा पती, भरत)
यथाशक्ति भावे करीतात सेवा
कृपाशील व्हावे दयावान देवा ॥ ०९


स्वभक्ताग्रगण्यैः कपीशैर्महीशै :
अनीकैरनेकैश्च राम प्रसीद  ।
नमस्ते नमोऽस्त्वीश राम प्रसीद
प्रशाधि प्रशाधि प्रकाशं प्रभो माम्  ॥ १० ॥

मराठी- हे परमेश्वरा, रामा, तुझ्या सर्वश्रेष्ठ भक्तांसह, वानरप्रमुख, राजे, त्यांच्या अनेक सैनिकांसह असलेल्या तुला नमस्कार असो. मला प्रकाशाचे (ज्ञानाचे) मर्गदर्शन कर, मार्गदर्शन कर.

सवे भक्त भूपाल सारे ससैन्य
थवे वानरांचे तसे श्रेष्ठ धन्य ।
नमस्कार राया कृपा ही करावी
मला जीवनी ज्ञान दीपास दावी ॥ १०


त्वमेवासि दैवं परं मे यदेकं
सुचैतन्यमेतत्त्वदन्यं न मन्ये ।
यतोऽभूदमेयं वियद्वायुतेजो-
जलोर्व्यादिकार्यं चरं चाचरं च ॥ ११ ॥

मराठी- माझ्यासाठी तूच महान दैवत आहेस, एकच असे शुभ चैतन्य ज्यापासून आकाश, वायू,  तेज, आप, पृथ्वी तसेच विश्वातील चराचर वस्तू निर्माण झाल्या. मी तुझ्याखेरीज दुसर्‍या कोणालाही देव मानत नाही.

मला एकटा थोर तू देव होसी
नसे शक्ति दैवी कुणी ज्ञात ऐसी ।
दिली पंचभूते जयाने जगासी
दिला जन्म अस्थीर तैसा स्थिरासी ॥ ११


नमः सच्चिदानन्दरूपाय तस्मै
नमो देवदेवाय रामाय तुभ्यम् ।
नमो जानकीजीवितेशाय तुभ्यं
नमः पुण्डरीकायताक्षाय तुभ्यम् ॥ १२ ॥

मराठी- आस्तित्वस्वरूप, प्रज्ञास्वरूप व आनंदस्वरूप असणार्‍या त्याला नमस्कार असो. देवांचा देव असणार्‍या हे रामा, तुला नमस्कार असो. सीतेच्या जीवनाचा आधिकारी असणार्‍या तुला नमस्कार असो, शुभ्र कमळाप्रमाणे लांबट डोळे असणार्‍या (श्रीरामा) तुला नमस्कार असो.

मती-मोद-आत्मस्वरूपा नमस्ते
प्रभो देवतांच्या अजेया नमस्ते ।
सरोजाजसे दीर्घ डोळे जयाचे
मनी वंदितो पाय सीतापतीचे ॥ १२


नमो भक्तियुक्तानुरक्ताय तुभ्यं
नमः पुण्यपुञ्जैकलभ्याय तुभ्यम् ।
नमो वेदवेद्याय चाद्याय पुंसे
नमः सुन्दरायेन्दिरावल्लभाय ॥ १३ ॥

मराठी- हे रामा, जे आपली भक्ती करणार्‍यांबद्दल ज्याच्या  मनात प्रेम असते अशा तुला नमस्कार असो. महान पुण्य करणार्‍यांना उपलब्ध असणार्‍या तुला नमस्कार असो. जो (केवळ) वेदांनाच ठावा आहे अशा आदि पुरुषाला नमस्कार असो. रमेच्या सुंदर पतीला माझा नमस्कार असो.

तुझी प्रीत भक्ताप्रती रे, नमस्ते
तुझा लाभ पुण्ये महा रे, नमस्ते ।
श्रुती आद्य जाणे पुरूषा, नमस्ते
पती साजिरा तू रमेचा, नमस्ते ॥ १३


नमो विश्वकर्त्रे नमो विश्वहर्त्रे
नमो विश्वभोक्त्रे नमो विश्वमात्रे ।
नमो विश्वनेत्रे नमो विश्वजेत्रे
नमो विश्वपित्रे नमो विश्वमात्रे ॥ १४ ॥

मराठी- विश्वाचा निर्माता, विश्वाचा नाश करणारा, (संपूर्ण विश्वावर राज्य करून) त्याचा उपभोग घेणारा, विश्वाचा नेता, त्याचा पिता आणि माता असलेला, संपूर्ण विश्व जिंकून घेणारा आणि विश्वरूपच असणार्‍या त्याला नमस्कार असो.

जगा निर्मिले, राखिले, नाश कर्ता
जगा तूच माता, जगा तूच नेता ।
पिता तू जगा, तू जगाचा विजेता
तुला विश्वरूपा नमस्कार आता ॥ १४


नमस्ते नमस्ते समस्तप्रपञ्च-
प्रभोगप्रयोगप्रमाणप्रवीण ।
मदीयं मनस्त्वत्पदद्वन्द्वसेवां
विधातुं प्रवृत्तं सुचैतन्यसिद्ध्यै ॥ १५ ॥

मराठी-  सर्व जगाच्या पसार्‍यात (भक्तांना) आनंद सुखोपभोग देणार्‍या, तेजतत्त्वाचा स्वामी असणार्‍या, ज्ञानी (रामचंद्रा) तुला नमस्कार असो. माझ्या मनी शाश्वत सत्य चेतना जागृत होण्यासाठी मी तुझ्या दोन पावलांची सेवा करतो.

पसाऱ्यात सार्‍या जगाच्या जनांना
प्रभू तेजतत्त्वास देई सुखांना ।
नमस्कार माझा तुझ्या पावलांना
मनी माझिया चेतना जागवी ना ॥ १५


शिलापि त्वदन्घ्रिक्षमासङ्गिरेणु-
प्रसादाद्धि चैतन्यमाधत्त राम ।
नरस्त्वत्पदद्वन्द्वसेवाविधाना-
त्सुचैतन्यमेतेति किं चित्रमद्य ॥ १६ ॥

मराठी- हे श्रीरामा, तुझ्या केवळ पावलांच्या दयाळू धूलिकणांच्या प्रसादाने एका दगडालाही चैतन्य आले. मग तुझ्या पावलांच्या निरंतर सेवेने मनुष्यांना सर्वोच्च देहभान प्राप्त होईल यात काय आश्चर्य ?

दयाळू धुळीने तुझ्या पावलांच्या
भरे जोम निर्जीव अंगी शिळेच्या ।
अचंबा नसे पूजने या पदांच्या
फुलारून ये जाणिवा अंतरीच्या || १६


पवित्रं चरित्रं विचित्रं त्वदीयं
नरा ये स्मरन्त्यन्वहं रामचन्द्र ।
भवन्तं भवान्तं भरन्तं भजन्तो
लभन्ते कृतान्तं न पश्यन्त्यतोऽन्ते ॥ १७ ॥

मराठी- हे रामचंद्रा, जे लोक तुझ्या पुण्यदायी विस्मयकारक चरित्राचे दररोज स्मरण करतात, जगताला बंधमुक्त करणार्‍या आणि विश्वाचा आधारभूत असणार्‍या तुझी भक्ती करतात, ते तुला प्राप्त करतात आणि म्हणून (आयुष्याच्या) शेवटी त्यांची यमाशी गाठ पडत नाही.

जगा मुक्ति दात्या नि आधारभूता
तुझी आठवी खास जो पुण्य गाथा ।
जना लाभ होई तुझा नित्य भक्ता
यमा दृष्टि भेटी न होईल अंता ॥ १७


स पुण्यः स गण्यः शरण्यो ममायं
नरो वेद यो देवचूडामणिं त्वाम् ।
सदाकारमेकं चिदानन्दरूपं
मनोवागगम्यं परन्धाम राम ॥ १८ ॥

मराठी- हे श्रीरामा, सत्यस्वरूप असलेल्या, प्रज्ञा आणि आनंदरूप असलेल्या, देवांमध्ये सर्वश्रेष्ठ असणार्‍या, मन आणि वाणी यांच्या आवाक्यापलिकडे असणार्‍या, सर्वोच्च मुक्तिधाम अशा तुला जो जाणतो तो माझ्यासाठी अत्यंत पुण्यवान, आदरणीय आसराच आहे.

तुला देवश्रेष्ठा मती-मोद रूपा
मना-वाणि पल्याड सत्यस्वरूपा ।
तुला जाणतो मुक्ति सर्वोच्च धामा
मला मान्य तो धन्य पुण्यात्म, रामा ॥ १८


प्रचण्डप्रतापप्रभावाभिभूत-
प्रभूतारिवीर प्रभो रामचन्द्र ।
बलं ते कथं वर्ण्यतेऽतीव बाल्ये
यतोऽखण्डि चण्डीशकोदण्डदण्डः ॥ १९ ॥

मराठी- (आपल्या) महाभयंकर शौर्याने असंख्य शत्रूच्या वीरांना जिकणार्‍या प्रभू रामचंद्रा, तुझ्या असीम ताकदीचे वर्णन कसे करावे, कारण तू लहानपणीच शंकराचे धनुष्य मोडून टाकले होतेस !

महाताकदीने पराभूत सारे
रिपूवीर केले रघूनायका रे ।
कशी शक्ति वर्णू तुझी मी परेशा       (परेश- श्रीराम)
तुझे बाल्य तोडी शिवाच्या धनुष्या  ॥ १९


दशग्रीवमुग्रं सपुत्रं समित्रं
सरिद्दुर्गमध्यस्थरक्षोगणेशम् ।
भवन्तं विना राम वीरो नरो वा-
ऽसुरो वाऽमरो वा जयेत्कस्त्रिलोक्याम् ॥ २० ॥

मराठी-  (आपल्या) मुलांबरोबर, मित्रांबरोबर असलेल्या, समुद्राच्या मध्यभागी असलेल्या किल्ल्यात रहाणार्‍या राक्षसांच्या प्रमुख कठोर रावणाला तिहीं लोकात आपणाखेरीज दुसरा कोण, मग तो माणूस, दानव वा देव असो जिंकू शकेल ?

सुतां संगती, साथही सोबत्यांची
समुद्री सुरक्षा गढी रावणाची ।
त्रिलोकी तया कोण जिंकू शकेना
सुरासूर रामा तुझ्यावीण जाणा ॥ २०


सदा राम रामेति रामामृतं ते
सदाराममानन्दनिष्यन्दकन्दम् ।
पिबन्तं नमन्तं सुदन्तं हसन्तं
हनूमन्तमन्तर्भजे तं नितान्तम् ॥ २१ ॥

मराठी- तुझ्या ‘ राम राम’ असा रामनामाचा अमृताचा सदा आनंददायी प्रवाह प्राशन करणार्‍या, तुला नमस्कार करणार्‍या, (आनंदी) स्मितहास्य करणार्‍या, सुरेख दंतपंक्ती असलेल्या मारुतीचे मी मनःपूर्वक पूजन करतो.

सदा राम नामामृता पीत राही
सुखस्रोत आनंददायी प्रवाही ।
मुखी हास्य भावार्त हस्ते प्रणामी
तया मारुतीच्या करी पूजना मी ॥ २१


यत्र यत्र रघुनाथकीर्तनं
तत्र तत्र कृत-मस्तकाञ्जलिम् ।
बाष्पवारिपरिपूर्ण-लोचनं
मारुतिम् नमत राक्षसान्तकम् ॥ २२

मराठी- जेथे जेथे श्रीरामाचे कीर्तन चालते, तेथे तेथे मस्तकावर हात जोडून (मस्तक लववून) उभ्या, (भक्तीने) नेत्र पाण्याने ओथंबलेल्या (व) राक्षसांचा नाश करणार्‍या मारुतीला वंदन करा.

राम कीर्तन कुणी करी जिथे
हात जोडुन शिरी झुके तिथे ।
दाटल्या नयनसंपुटी जले,
दानवारि कपिश्रेष्ठ वंदिले ॥ २२      (दानवारि – दैत्यांचा शत्रू)

टीप- महाराष्ट्रात, मंदिरात देवाला नमस्कार करताना देवाकडे तोंड करून हात नाकासमोर वा छातीजवळ जोडून वंदन करण्याची पद्धत आहे. तथापि दक्षिण भारतात साष्टांग किंवा साधा नमस्कार करताना देवासमोर काटकोनात उभे राहून हात डोक्यावर जोडण्याची पद्धत दिसून येते. या प्रथेनुसार दुसर्‍या ओळीतील ‘ मस्तकाञ्जलिम् ’ या शब्दाचा अर्थ ‘ मस्तकावर हात जोडून ’ असा केला जाऊ शकतो.


असीतासमेतैरकोदण्डभूषैः
असौमित्रिवन्द्यैरचण्डप्रतापैः ।
अलङ्केशकालैरसुग्रीवमित्रैः
अरामाभिधेयैरलम् देवतैर्नः ॥ २३ ॥

मराठी- ज्यांच्या नावाशी सीता संलग्न नाही, कोदंड धनुष्याची ज्यांना शोभा नाही, लक्ष्मण ज्यांना नमस्कार करत नाही, जे महान पराक्रमी वीर नाहीत, ज्यांनी लंकाधीश रावणाचा वध केला नाही, ज्यांची सुग्रीवाबरोबर मैत्री नाही, ज्यांचे नाव ‘राम’ नाही, पुरे झाले असले देव ! (आमच्या साठी एकटा रामच पुरेसा आहे).

सवे जानकी ना, न कोदंड हाती
महावीर नाही, न सुग्रीव साथी ।
न सौमित्र वंदी, न लंकेश मारी
नसे राम नामी, पुरे देव भारी ॥ २३


अवीरासनस्थैरचिन्मुद्रिकाढ्यैः
अभक्ताञ्जनेयादितत्त्वप्रकाशैः ।
अमन्दारमूलैरमन्दारमालैः
अरामाभिधेयैरलम् देवतैर्नः ॥ २४ ॥

मराठी- जे वीरासनात बसलेले नाहीत, जे ज्ञानमुद्रेत नाहीत, हनुमान आणि इतर भक्तांना जे आदितत्त्वाचे प्रतिपादन करत नाहीत, जे मंदार वृक्षाखाली बसले नाहीत, ज्यांच्या गळ्यात मंदार पुष्पांच्या माळा नाहीत, ज्यांचे नाव ‘राम’ नाही, पुरे झाले असले देव ! (आमच्या साठी एकटा रामच पुरेसा आहे).

नसे ज्ञान मुद्रा न वीरासनाही
हनूमान भक्तादिका बोध नाही ।
न मंदार माला, न मंदार छाया
नसे राम नामी, असे देव वाया ॥ २४


असिन्धुप्रकोपैरवन्द्यप्रतापैः
अबन्धुप्रयाणैरमन्दस्मिताढ्यैः ।
अदण्डप्रवासैरखण्डप्रबोधैः
अरामभिदेयैरलम् देवतैर्नः ॥ २५ ॥

मराठी-  ज्यांनी समुद्रावर राग व्यक्त केला नाही, ज्यांचा पराक्रम वंदनीय नाही, ज्यांना नातलगांमुळे घर सोडून जावे लागले नाही (आणि तरीसुद्धा) ज्यांच्या चेहेर्‍यावर स्मितहास्य झळकले नाही, ज्यांनी दंडकारण्यात प्रवास केला नाही, ज्यांनी (जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इ.बद्दल) प्रबोधन केले नाही, ज्यांचे नाव ‘राम’ नाही, पुरे झाले असले देव ! (आमच्या साठी एकटा रामच पुरेसा आहे).

नसे सागरी राग, न शौर्यप्रशंसा
सगे दूर सारीत दंडप्रवासा ।
न केले प्रबोधा, मुखी स्थान हास्या,
नसे राम नामी, असे देव वाया ॥ २५


हरे राम सीतापते रावणारे
खरारे मुरारेऽसुरारे परेति ।
लपन्तं नयन्तं सदाकालमेव
समालोकयालोकयाशेषबन्धो ॥ २६ ॥

मराठी- हे सियावर, रावण अंतकारी, खर आणि मुर राक्षसांचा शत्रू, (तू) सर्वश्रेष्ठ (आहेस), असे सदा पुटपुटत सर्वकाळ घालविणार्‍या (मजकडे) सर्व जनांच्या सख्या, तुझी कृपादृष्टी ठेव.

पती जानकीचा, रिपू रावणाचा
खराचा मुराचा अरी दानवांचा ।
सदा बोलता काळ जाई, तुझी ही
कृपा दृष्टि बंधो मला नित्य पाही ॥ २६


नमस्ते सुमित्रासुपुत्राभिवन्द्य
नमस्ते सदा कैकयीनन्दनेड्य ।
नमस्ते सदा वानराधीशवन्द्य
नमस्ते नमस्ते सदा रामचन्द्र ॥ २७ ॥

मराठी- सुमित्रेचे मुलगे (लक्ष्मण आणि शत्रुघ्न) यांना आदरणीय, कैकेयीचा मुलगा (भरत) याला स्तुत्य, वानरांचा राजा सुग्रीवाला सदैव वंदनीय अशा रामचंद्रा तुला माझा नित्य नमस्कार.

सुमित्रा सुतां वंदनीया, नमस्ते
सदा स्तुत्य कैकेयिपुत्रा, नमस्ते ।
नृपा सुग्रिवा पूजनीया, नमस्ते
सदा रामचंद्रा नमस्ते नमस्ते ॥ २७


प्रसीद प्रसीद प्रचण्डप्रताप
प्रसीद प्रसीद प्रचण्डारिकाल ।
प्रसीद प्रसीद प्रपन्नानुकम्पिन्
प्रसीद प्रसीद प्रभो रामचन्द्र ॥ २८ ॥

मराठी-  हे महावीरा, दांडग्या शत्रूंचा अंत करणार्‍या, शरण आलेल्यांबद्दल दयाबुद्धी बाळगणार्‍या प्रभू रामचंद्रा (तू आमच्यावर) दया कर, दया कर.

जनासी करी तू कृपा शूर भारी
करी रे कृपा जो करी ठार वैरी ।
तया तारिसी येत जे आश्रयाला
दया दाखवी दाखवी तू कृपाळा ॥ २८


भुजङ्गप्रयातं परं वेदसारं
मुदा रामचन्द्रस्य भक्त्या च नित्यम् ।
पठन् सन्ततं चिन्तयन् स्वान्तरङ्गे
स एव स्वयम् रामचन्द्रः स धन्यः ॥ २९ ॥

मराठी- हे, श्रेष्ठ, वेदांचे साररूप भुजंगप्रयात स्तोत्र जो आनंदाने आणि श्रीरामाच्या भक्तीने नेहेमी म्हणतो आणि अंतर्मनात सतत चिंतन करतो तो स्वतःच श्रीरामस्वरूप होतो, तो धन्य होय.

असे चार ‘यं’ चे श्रुतीसार गाती
रघूनायकाची असे ठाम भक्ती ।
सदा चिंतनी ध्यान आनंद चित्ती
जणू राम साक्षात ते धन्य होती ॥ २९

टीप- हे स्तोत्र ‘ भुजंगप्रयात ’ वृत्तात रचलेले आहे. त्याचे गण ‘ य य य य ’ असे असल्याने येथे त्याचा उल्लेख ‘ चार यं चे ’ असा करण्याचे ‘ कवीचे स्वातंत्र्य ’ घेतले आहे.

॥ इति श्रीशङ्कराचार्यविरचितम्  श्रीरामभुजङ्गप्रयातस्तोत्रम्  सम्पूर्णम् ॥

*******************

— धनंजय बोरकर
९८३३०७७०९१

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

1 Comment on श्रीरामभुजंगस्तोत्र – मराठी अर्थासह

  1. सुंदर समश्लोकी भाषांतर.
    नमोनमः

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..