कटाक्षे दयार्द्रां
करे ज्ञानमुद्रां
कलाभिर्विनिद्रां
कलापैः सुभद्राम् ।
पुरस्त्रीं विनिद्रां पुरस्तुङ्गभद्रां
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् ॥२॥
कटाक्षे दयार्द्रां- आईशारदांबेचा कटाक्ष अर्थात दृष्टी भक्तांच्या प्रती ओसंडून वाहणाऱ्या दयेने परिपूर्ण आहे. जिच्या कृपाकटाक्षाने भक्तांच्या सकल मनोकामना तत्काळ पूर्ण होतात.
करे ज्ञानमुद्रां- अंगठा आणि तर्जनी एकमेकाला जोडल्यावर तयार होणाऱ्या मुद्रेला ज्ञानमुद्रा असे म्हणतात. विश्वाला ज्ञान प्रदान करणारी देवी शारदा, सरस्वती हस्तकमलाची अशी ज्ञानमुद्रा साकारत असते. त्याआधारे सकल ज्ञानाचा मी मूलस्रोत आहे असेच सुचविणारी.
कलाभिर्विनिद्रां- आपल्या कलांच्या द्वारे सतत जागृत असते अशी.
जगदंबेचे स्वरूप आहे तेज. त्या तेजानेच ज्ञान होते. दिवसा सूर्य, रात्री चंद्र, अंधारात दीप इत्यादी तेजाचे सर्व प्रकार आई जगदंबेच्या कला आहेत. या सगळ्यांच्या द्वारे ती ज्ञान प्रदान करते. यापैकी कोणते ना कोणते साधन सदैव उपस्थित असल्याने तिला विनिद्रा असे म्हटले.
कलापैः सुभद्राम् – कलाप अर्थात दागिन्यांच्या द्वारे सुभद्रा अर्थात अत्यंत सुंदर दिसणारी.
पुरस्त्रीं- पुरस्त्री शब्दाचा एक अर्थ सर्व स्त्रियांमध्ये आद्यस्थानी असणारी आदिशक्ती. तर दुसरा अर्थ असा की,पूर म्हणजे शरीर. त्यात चैतन्य रूपात निवास करणारी ती पुरस्त्री.
विनिद्रां- अखंड जागृत असणारी.निद्रारूपी अज्ञानाचा स्पर्श नसणारे शुद्ध चैतन्य. अविरत चैतन्यशीला.
पुरस्तुङ्गभद्रां- जिचे पुर म्हणजे निवासस्थान तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर श्रीक्षेत्र शृंगेरी येथे आहे अशी.
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् – अशा त्या मम माता सर्वश्रेष्ठ शारदांबेचे मी भजन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply