सुसीमन्तवेणीं दृशा निर्जितैणींरमत्कीरवाणीं नमद्वज्रपाणिम् ।
सुधामन्थरास्यां मुदा चिन्त्यवेणीं
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् ॥४॥
सुसीमन्तवेणीं- सीमंत अर्थात भांग. वेणी अर्थात मागे लांब केसांची केलेली रचना. या दोन्ही गोष्टींना सु उपसर्ग लावला. अर्थात या दोन्ही गोष्टी सुंदर पद्धतीने तयार केलेल्या. विविध अलंकार तथा पुष्पांनी सजविलेल्या.
दृशा निर्जितैणीं- आईसाहेबांच्या दृष्टीचे वर्णन करताना जगद्गुरूंनी ही शब्दरचना केली आहे. सर्वाधिक सुंदर दृष्टी, डोळे हरिणीचे असतात. टपोरे, काळेभोर, पाणीदार असे हरिणीचे किंवा मासोळीचे डोळे उपमे साठी वापरल्या जातात. मृगाक्षी किंवा मीनाक्षी असे शब्द त्याआधारे तयार झाले आहेत. येथे आचार्य म्हणतात आई जगदंबा आपल्या दृष्टीने हरिणीच्या दृष्टीला ही जिंकून घेते. अर्थात तिच्या पेक्षाही अधिक सुंदर डोळे असणारी ती दृशा निर्जितैणी.
रमत्कीरवाणी- कीर म्हणजे पोपट. पोपट बोलतो. जे शिकवले तेच बोलतो. असा शुक जगदंबेने हाती धरलेला आहे. जे शास्त्रानुसार बोलतात, वागतात, त्यांना आई जगदंबा हात देते, आधार देते असा अर्थ. त्या शुकाची वाणी ऐकण्यात रममाण होणारी ती रमत्कीरवाणी. शास्त्रवचन ऐकण्यातच जिला आनंद वाटतो अशी.
नमद्वज्रपाणि- ज्यांच्या हातात वज्र आहे ते देवराज इंद्र, जिला वंदन करतात अशी.
सुधामन्थरास्या- सुधा म्हणजे अमृत. ते स्वर्गात असते. जिच्या मुखावर अमृताप्रमाणे स्वर्गीय आनंद विलसत आहे अशी.
मुदा चिंत्यवेणी- वेणी शब्दाचा अर्थ एकामागोमाग येणारी सातत्यपूर्ण रचना. भक्तांनी इच्छिलेल्या गोष्टींना अशी एकामागोमाग एक आनंदाने प्रदान करणारी.
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् – अशा माझ्या सर्वश्रेष्ठ आई शारदेचे मी भजन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply