सुशान्तां सुदेहां दृगन्ते कचान्तां
लसत् सल्लताङ्गीमनन्तामचिन्त्याम् ।
स्मतां तापसैः सर्गपूर्वस्थितां तां
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् ॥५॥
सुशान्तां- आई जगदंबेचे स्वरूप अत्यंत शांत आहे. अशांती, हलचाल काही मिळवण्यासाठी असते. ती पूर्णतृप्त असल्याने शांत आहे.
सुदेहां- आई शारदांबेचा देह अत्यंत सुंदर अर्थात निर्दोष आहे.
दृगन्ते कचान्तां- कच म्हणजे केस. जिचे केस दिशांच्याही पलीकडे पसरले आहेत अशी. दिशा अर्थात आपल्या दृष्टीची मर्यादा. त्यापलीकडे केस पसरलेली, अर्थात अमर्याद. अपरिमित. अतिविशाल.
लसत् सल्लताङ्गी- लसत् अर्थात फुललेली. लता म्हणजे वेल. जिची अंग यष्टि एखाद्या फुललेल्या वेलीप्रमाणे नाजूक आणि नयनमनोहर, आनंददायी आहे अशी.
अनन्ता- जिला अंत नाही अशी. अंत त्याच गोष्टीला असतो ज्या गोष्टीला आरंभ असतो. आई जगदंबा जन्माला आलेलीच नाही त्यामुळे ती अनादी आहे. पर्यायाने अनंत आहे.
अचिन्त्या- चिंतनाच्या पार असलेली. माणूस चिंतन त्याच गोष्टीचे करू शकतो जी गोष्ट त्याने कधीतरी पाहिली, ऐकली असते. ज्ञानेन्द्रियांनी अनुभवली असते. मात्र निर्गुण, निराकार स्वरुप जगदंबा ज्ञानेंद्रियांचा विषय नसल्याने तिचे रूढार्थाने चिंतन संभवतच नाही.
स्मतां तापसैः- तपस्वी लोक सदैव जिचे स्मरण करतात अशी. सामान्य अर्थाने तिचे चिंतन शक्य नसले तरी वेद, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, श्री गुरूंनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे तिच्या दिव्यत्वाचे स्मरण करणे शक्य आहे. योगी तसेच स्मरण करीत असतात.
सर्गपूर्वस्थिता- या विश्वाच्या निर्मितीला सर्ग असे म्हणतात. त्याच्या पूर्वी स्थित अर्थात अस्तित्वात असलेली.
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् – अशा माझ्या सर्वश्रेष्ठ आई शारदेचे मी भजन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply