कुरङ्गे तुरङ्गे मृगेन्द्रे खगेन्द्रेमराले मदेभे महोक्षेऽधिरूढाम् ।
महत्यां नवम्यां सदा सामरूपां
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् ॥६॥
प्रस्तुत श्लोकांच्या पहिल्या दोन चरणात भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आई जगदंबेच्या वेगवेगळ्या वाहनांचा विचार मांडत आहेत.
कुरङ्गे – कुरंग म्हणजे हरिण. ज्यावेळी भक्तांच्या भेटीला अत्यंत वेगात जायचे असते ज्यावेळी आई जगदंबा हरिणाच्या वेगात जाण्यासाठी त्यावर बसते असा अर्थ. तुरङ्गे- तुरंग म्हणजे घोडा. हरिण वेगात जाते पण त्याला मर्यादा आहे. ते फार लांब वर जाऊ शकत नाही. अशावेळी आई जगदंबा घोड्याचा उपयोग करते.
मृगेन्द्रे- मृग म्हणजे सर्व प्राणी. इंद्र म्हणजे राजा. अर्थात सिंह. त्या सर्व जीवांच्या राजावर सुद्धा तिची सत्ता चालते म्हणून ती सिंहावर बसते. खगेन्द्रे- खग म्हणजे पक्षी. त्यांचा राजा. अर्थात गरुड. सर्वाधिक उन्नत झेप घेणाऱ्या या जीवावर सुद्धा तिची सत्ता चालते हे म्हणून गरुडाला तिचे वाहन वर्णिले असते.
मराले – मराल म्हणजे हंस.
महिषमर्दिनी सिंहावर तर नारायण रूपात गरुडावर बसणारी जगदंबा सरस्वती रूपात हंसवाहिनी होते.
मदेभे – इभ म्हणजे हत्ती. ज्याला मदस्राव होत आहे असा हत्ती म्हणजे मदेभ. त्यावर बसणारी. महोक्षेऽधिरूढा – अक्ष म्हणजे गाडीला आडवा लावलेला दांडा. आस. महान अक्ष लावलेल्या रथावर आरूढ होणारी .
महत्यां नवम्यां- महान म्हणजे विशाल होणे. जी आपल्या ९ रूपात विशाल होते, प्रकट होते ती, महत्यां नवम्यां.
शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, चामुंडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री अशा नऊ रूपात आदिशक्ती प्रकट होत असते.
सदा सामरूपां- अर्थात अशा नऊ रूपात कार्य करीत असली तरी अंतरी तिचे स्वरूप शुद्ध, निर्मळ, निर्गुण, निराकार रूप स्थिर असते. त्यामुळे तिला सदा सामरूपा असे म्हणतात.
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् – अशा माझ्या अतिदिव्य आई शारदेला मी वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply