ज्वलत्कान्तिवह्निं जगन्मोहनाङ्गींभजन्मानसाम्भोजसुभ्रान्तभृङ्गीम् ।
निजस्तोत्रसङ्गीतनृत्यप्रभाङ्गी
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् ॥७॥
ज्वलत्कान्तिवह्नि- ज्वलत् म्हणजे प्रज्वलित असलेला, ज्वालांनी युक्त असलेला. वह्नि म्हणजे अग्नी. तर कांती म्हणजे शरीराचे तेज, चमक. जिच्या शरीराची चमक उज्वल अग्नीप्रमाणे देदिप्यमान आहे अशी ती ज्वलत्कान्तिवह्नि.
जगन्मोहनाङ्गी- संपूर्ण जगाला आपल्या अंगाने मोहित करणारी, हा झाला सामान्य अर्थ.
तर अध्यात्मिक दृष्टीने अंग म्हणजे साह्यकारी घटक. जगाला मोहित करण्यासाठी जे जे घटक कारणीभूत आहेत त्या सगळ्यांना अंग असे म्हणतात. तर त्या सगळ्यांची अंगी म्हणजे त्यामागे असणारी चैतन्यशक्ती. जगातील सर्व मोहन क्रियांच्या मागे असणारी आधारभूत चैतन्यशक्ती म्हणजे जगन्मोहनाङ्गी.
भजन्मानसाम्भोजसुभ्रान्तभृङ्गीम्- भजन करीत असणाऱ्या भक्तांच्या मन रुपी कमळावर आकृष्ट होऊन भ्रमण करणारी भ्रमरी. जसा भुंगा त्या कमळाच्या सुगंधाचा आणि मकरंदाचा आस्वाद घेऊन रुंजी घालतो तशी भक्तांच्या भजनाच्या आनंदात, आत्ममग्न रूपात डुलत असणारी.
निजस्तोत्रसङ्गीतनृत्यप्रभाङ्गी- आपल्या स्तोत्रावर आधारित संगीत आणि नृत्याच्या आनंदाने मुखकमल उजळून निघाले आहे अशी. आई जगदंबेला संगीत आणि नृत्य आवडते. पण ते अन्य कोणतेही नाही तर तिच्या स्तुतीवर आधारलेले,अर्थात शुद्ध,सात्विक, आध्यात्मिक संगीत आणि नृत्य.
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम्- अशा माझ्या अत्यंत श्रेष्ठ आई शारदेचे मी भजन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply