श्री गणेश अवतारलीला ५ – श्रीशेषात्मज अवतार
सृष्टी निर्मितीच्या आरंभ काळात भगवान ब्रह्मदेव आपल्या कार्यात व्यस्त होते. त्यावेळी त्यांच्या मुखातून अचानक एक बालक प्रकट झाले. त्याला पाहून ब्रह्मदेवांच्या मनात आत्मीयता निर्माण झाल्याने त्यांनी त्याचे नाव मायाकर असे ठेवले. त्याला अनेकानेक वरदाने दिली.
आयत्या मिळालेल्या वरदानाने उन्मत झालेला मायाकराला विप्रचित्ती नावाचा राक्षस भेटला. त्याच्या सल्ल्याने मायाकराने संपूर्ण विश्वावर विजय मिळवला.
वनवासी झालेल्या देवता त्याच्या विनाशाकरिता श्रीगणेश उपासना करते झाले. प्रसन्न झालेल्या श्री गणेशांनी शेषांकडे अवतार घेण्याचा वर दिला.
स्वर्ग जिंकलेला मायाकर पाताळात गेला. या भीषण संकटाच्या वेळी पूर्वी केलेल्या तपाच्या आधारे श्री शेषांनी प्रार्थना केल्यावर भगवान त्यांच्या मनातून श्रीशेषात्मज रूपात प्रकट झाले.
देवतांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी मायाकर विनाशाची प्रार्थना केली. भगवान म्हणाले ते तर आम्ही करू. पण त्यासाठी काहीतरी अपूर्व वाहन हवे.
देवता विचारात पडल्या. वेगळे वाहन आणायचे कुठून? त्यावेळी भगवान शंकरांनी सांगितले की आपण सर्व देव जीवांच्या शरीरात निवास करून त्यात देहाने घेतलेले भोग न कळू देता उपभोगतो. या कृतीला शास्त्रात मूषक म्हणतात. जसा उंदीर कुठलीही गोष्ट न कळू देता लपून चोरतो तसेच हे कार्य असल्याने आपण त्या मूषकालाच तयार करू.
श्री शंकरांच्या सांगण्यावरून सर्व देवतांनी आपल्या शक्तीला एकत्र करीत एक अतिदिव्य मूषक तयार केला.
त्या मूषकावर बसल्याने श्रीशेषात्मजांनाच मूषकग असेही नाव मिळाले.
या भगवंताच्या पाताळात झालेल्या अवताराची तिथी आहे ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी.
जय शेषात्मज.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply