नवीन लेखन...

श्री शिल्लक

तिला कळत नव्हतं ,त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय .
कालपासून त्यांचं वागणं काहीसं अनाकलनीय वाटत होतं .
पंचेचाळीस वर्षांच्या सहजीवनाचा इतिहास ती कालपासून धुंडाळत होती . थोडंसं काही हाती लागत होतं , काही हातातून निसटून जात होतं .
पण कालपासूनच्या वागण्याचा बोध तिला होत नव्हता .

तोंडाला चव नाही , अंगात थोडी कणकण जाणवतेय आणि श्वास घ्यायला अडचण होतेय , हे त्यांनी सांगितल्यावर ती धास्तावली होती .
आग्रह करकरून तिनं , त्यांना टेस्ट करायला पाठवलं होतं .
पण रिपोर्टमध्ये काय आहे हे ते सांगत नव्हते .
तिनं विचारलं होतं.
वेगवेगळ्या वेळी . अचानक . प्रेमाने . भांडून . अबोला धरून .
पण त्यांनी रिपोर्ट बद्दल एक शब्द उच्चारला नव्हता .
बरं, लॅब मध्ये चौकशी करावी तर शहरात सतराशे साठ लॅब.
ती हैराण झाली होती .

संध्याकाळी गॅलरीतून ते कुणाशी तरी फोनवर बोलताना तिनं ऐकलं होतं .
तुटक संभाषण कानावर आलं होतं …

“..बेड..ऑक्सिजन..व्हेंटिलेटर..दोन्ही वेळचं साधं जेवण..”
आणि असं बरंच काही .

तिचा धीर पार सुटत चालला होता .
डोळे प्रवाहित झाले होते .

” आज आपण मांडवीच्या जेटीवर जाऊ बसायला . गप्पा मारू भरपूर . आणि हो , तुला आवडणारी भेळ खाऊ . शहळ्याचं पाणी आणि मऊसूत खोबरं . ”
तिला हुंदका अनावर झाला .

” आजच का ? ”
” सगळ्या गोष्टी अगोदर सांगायच्या नसतात , काही सरप्राईज ठेवायचं असतं . नियती नाही का सरप्राईज देत आपल्याला , तसं .”
” म्हणजे ?”
तिचा हात छातीवर गेला .
श्वास मध्येच अडकल्यासारखा वाटला तिला .
” रिपोर्ट काय सांगतोय ?”
तिनं पुन्हा विचारलं .
पण ते तिथे नव्हतेच .

— आणि हट्ट करून तिला मांडवीच्या जेटीवर आणलं होतं .

ते दुरून येताना दिसले .
भेळ , शहाळ्याचं पाणी घेऊन येताना त्यांची तारांबळ उडत होती . पण तरीही उत्साह जाणवत होता .
तिला कसंतरीच वाटलं .
ती पुढं होणार इतक्या दहाबारा तरुण मुलंमुली त्यांना मदत करायला धावली .

” आजोबा , एक सेल्फी प्लीज ”
” शुअर , पण आमचा फोटो तुम्ही काढायचा . थांबा अगोदर पोज घेतो .”
त्यांनी भेळेचा घास तिच्या तोंडपर्यंत नेला .
पोरं एव्हाना चेकाळली होती .
एकीनं दोन स्ट्रॉ शहाळ्यात घातले .
” अहो , काय चाललंय हे , ओळखीची ना पाळखीची . काय म्हणतील ते ”
त्यांनी काही उत्तर दिलं नाही .
” अरे तिला लाजायला सांगणार नाही का तुम्ही ? लग्नात लय भारी लाजली होती .”
सगळे खिदळायला लागले .
त्या पोरांना हे नवीन होतं .

” आणि तुम्हाला महाबळेश्वरची गंमत सांगू का , आमच्या साग्रसंगीत हनिमूनची ?”

एव्हाना मांडवीवर येणाऱ्यांची गर्दी वाढायला लागली होती . येणारी गर्दी तिथेच थांबून हे सगळं पाहू लागली होती . अनेकांच्या मोबाईलमधले कॅमेरे सुरू झाले होते .

तिला मात्र मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं .
” आजोबा हनिमूनचं काय झालं ?” गर्दीतल्या कुणीतरी विचारलं .
“ते तिलाच विचारा .”
त्यांनी बॉल अलगद टोलवला .
” आजी सांगा ना .”
सगळ्यांनी टाळ्या वाजवत आग्रह धरला .
– आता आपण काही बोललो नाही तर प्रकरण वाढेल या भीतीनं तिनं हात उंचावला .
सगळे गप्प झाले .

” महाबळेश्वरला जाताना , सातारा स्टँडवर यांनी मोगऱ्याच्या गजऱ्यांची टोपलीच विकत घेतली होती . माझ्या मेलीच्या मनात काहीबाही येऊ लागलं . कारण हे रसिक होते हे माहीत होतं . पण महाबळेश्वरला गेल्यावर वेगळंच घडलं . यांनी त्यादिवशी संध्याकाळी फिरायला आलेल्या सगळ्या नव्या जोडप्यांना एकत्र केलं आणि गजरे घालण्याचा सामुदायिक कार्यक्रम केला .”
” कसली धमाल आली माहित्येय . महाबळेश्वरची ती संध्याकाळ एकदम गुलाबी रंगाची होऊन गेली . सगळ्यांचे गाल लज्जेनं गुलाबी झाले होते ना .”

सगळी गर्दी तुफान हसली . आणि समुद्राच्या लाटा अधिकच फेसळल्या .

आता तीदेखील गुंतू लागली .

” ह्यांनी मला प्रपोज केलं तो किस्सा जगावेगळा आहे . आमचं घर मंगलोरी कौलांचं होतं . हे शेजाऱ्यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते . दोनचार दिवसात आमची चांगलीच ओळख झाली होती . तर त्यादिवशी कौलं बदलण्याचं काम सुरू होतं . माझ्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी हे छपरावर चढले . आणि अचानक यांचा पाय घसरला . हे गडगडत खाली आले . पडले . पाय दुखावला . पण त्याही अवस्थेत , अनंताच्या झाडाचं फुल त्यांनी मिळवलं आणि वेदनेनं विव्हळत असताना सर्वांसमक्ष मला विचारलं , तुझ्या घरी प्रेमात ‘ पडलोय’, स्वीकारशील ? मग काय मी लाजून आत पळाले . झालं . महिन्याभरात घरच्यांनी लग्नच लावून दिलं .”
तिनं ओंजळीत चेहरा लपवत सांगितलं .

पण पुढच्या क्षणी तिला भान आलं आणि डोळ्यात आसवं उगवली .

” थँक्स मित्रांनो , मजा आली तुमच्या संगतीत . आता जरा कौटुंबिक जिव्हाळ्याचा प्रसंग सुरू होणार आहे .”
सगळे दूर पांगले .

” एक मिनीट , अशीच उभी रहा . मला फोटो काढू दे एक ”
तिला जास्त बोलू न देता त्यांनी पटकन फोटो काढला .
मोबाईल तिच्यासमोर धरला .
अस्ताला जाणारा सूर्य नेमका तिच्या अंबाड्यात विसावल्यासारखा दिसत होता .
” हे काय आता नवीन ?”
” हा अस्ताला जाणारा सूर्य तुझ्या केसात गुंतला .”
ती बघत राहिली . अविश्वासाने .
“तुम्हाला काय म्हणायचंय ?”
ते हसले .
” तुझ्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाही .हा सूर्य आज जरी अस्ताला जाणार असला तरी उद्या तो पुन्हा उगवणार आहे . आज अंबाड्यात विसावलेला सूर्य , उद्या तुझ्या जागं होण्याबरोबर खळाळत्या केसांमधून उगवणार आहे . मी त्याबाबत आश्वस्त आहे .”
“मग रिपोर्टचं काय ?”
तिनं पुन्हा चिकाटीनं विचारलं .
ते दिलखुलास हसले .
” तुला काय वाटलं , मला कोरोना झालाय ? मी पॉझिटिव्ह आहे ? वेडी गं वेडी . माझा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय . बेड ऑक्सिजन वगैरे सगळं नाटक करत होतो मी .कालच कळलं मला मी निगेटिव्ह असल्याचं . पण मी विचार केला , पुन्हा एकदा संधी घेऊया आनंदानं जगण्याची . मजा घेऊ या तुझ्या वाढलेल्या टेन्शनची. पुन्हा एकदा बघू या आठवणींची श्री शिल्लक किती आहे ती . उद्याच्या दिलखुलास जगण्यासाठी आठवणींची श्री शिल्लक असणं गरजेचं आहे . नाही का ?”
” हो पण , त्याकाळजीनं माझं काही बरं वाईट झालं असतं तर…”
” ते शक्यच नाही , कारण तुझ्या टेन्शनचं नियंत्रण माझ्या हाती आहे . हसायचं , हसवायचं आणि हसत हसत दिवस ढकलण्याची युक्ती मला माहित्येय .”
ती गप्प झाली .

अचानक फोन हाती घेतला .
” आत्ता ? कुठे ? हॉस्पिटलमध्ये ? येतो लगेचच आम्ही .अहो ,आपल्याला लगेचंच जायला हवं हॉस्पिटलमध्ये , चला लवकर , सांगते रिक्षात बसल्यावर .”

दोघही रिक्षेत बसली .तिनं पत्ता सांगितला .
ते चक्रावले .
“तू चुकून हॉस्पिटल ऐवजी हॉटेलचा पत्ता सांगितलास ”
” नाही हॉटेलचाच पत्ता सांगितला .श्री शिल्लक काय तुमच्याजवळ तेवढी आहे असं वाटलं का ? माझ्या जवळपण आहे . तुमच्या आवडत्या हॉटेलात कँडल लाईट डिनर घेणार आहोत आपण . तुमच्या आवडत्या मेन्यूसह.”
” मला आवडली तुझी श्री शिल्लक ”
ते म्हणाले आणि तिनं त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवलं .

रिक्षा भरधाव धावू लागली …

— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 121 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..