त्वदन्यः शरण्यः प्रपन्नस्य नेति
प्रसीद स्मरन्नेव हन्यास्तु दैन्यम् |
न चेत्ते भवेद्भक्तवात्सल्यहानि – स्ततो
मे दयालो सदा सन्निधेहि ‖ १० ‖
भक्ताच्या आणि भगवंताच्या आगळ्यावेगळ्या नात्याचे विवेचन करताना आचार्यश्री म्हणतात,
त्वदन्यः शरण्यः प्रपन्नस्य नेति – माझ्यासारख्या प्रपन्न अर्थात संसारातील दुःखांनी त्रस्तझाल्यानंतर शरण येणाऱ्यांसाठी सुख,शांती, समाधानाच्या प्राप्तीचे आपल्यासारखे अन्य स्थान नाही.
प्रसीद – त्यामुळे आपल्याला शरण आलेल्या माझ्यावर प्रसन्न व्हा.
स्मरन्नेव हन्यास्तु दैन्यम् – मी आपले स्मरण केले असल्याने माझे दैन्य दूर करा. माझ्या दुःखाचे शमन करा.
येथे आचार्य मधील भक्त भगवंतालाच वेगळ्या अर्थाने वेठीला धरतो. तो भगवंताला म्हणतो तुला हे दुःख दूर करणे भाग आहे. कारण त्यात माझाच नाही तुझा देशील फायदा आहे.
न चेत्ते भवेद्भक्तवात्सल्यहानि:- जर तू असे केले नाही तर तुझ्या ‘भक्तवात्सल्य’ भावाची हानी होईल. लोक तुला यापुढे भक्तवत्सल म्हणणारच नाहीत. त्यामुळे तुझ्या त्या भक्तवत्सल विशेषणाचा आब राखण्यासाठी का होईना, माझे रक्षण कर कारण मी तुझी भक्ती करीत आहे. त्यामुळे भक्ताचे संरक्षण करणे, त्याचे दुःख निवारण करणे हे जणू काही , हे भगवंता तुझे कर्तव्यच आहे.
ततो मे दयालो सदा सन्निधेहि – त्यामुळे हे दयासिंधू मला कायम आपल्याजवळ ठेव.
कारण हे भगवंता तुझ्या चरण कमला पाशी केवळ आणि केवळ आनंद आहे. तिथे माझे दुःख आपोआपच दूर होईल. त्यामुळे मला संनिध म्हणजे चरणकमलां जवळ स्थान दे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply