अयं दानकालस्त्वहं दानपात्रं
भवानेव दाता त्वदन्यं न याचे |
भवद्भक्तिमेव स्थिरां देहि मह्यं
कृपाशील शंभो कृतार्थोऽस्मि तस्मात् ‖ ११ ‖
भगवंताला आपण देव म्हणतो. त्याचा शास्त्रीय अर्थ जरी दिव्यतायुक्त असा असला तरी श्रद्धावानांच्या मनातील अर्थ जो देतो तो देव असा साधा-सोपा असतो. भगवंताच्या या दातृत्वाचा विचार आचार्यश्री या श्लोकात आधारभूत मानत आहेत.
ते म्हणतात,
अयं दानकाल:- हा दानाचा काळ आहे. कारण आत्ता मी आपल्यासमोर याचक स्वरूपात उभा आहे. मला आत्ता आपल्या कृपेची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणी मागणारा असेल, आणि त्याला ज्या वेळी आवश्यकता असेल तीच दानाची खरी वेळ. या हिशोबात ही दानाची वेळ आहे.
त्वहं दानपात्रं- मी दानास पात्र आहे. दान नेहमी पात्र व्यक्तीलाच द्यावे. ज्याच्याजवळ एखादी गोष्ट नसते तो ती गोष्ट प्राप्त करण्यास पात्र आहे. हे भगवंता माझ्यावर आपली कृपा झालेली नाही. त्यामुळे मी कृपेला पात्र आहे.
भवानेव दाता- आपण दाता आहात. आपल्याजवळ देण्याची क्षमता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दातृत्वाची भाव अर्थात देण्याची इच्छा देखील आहे.
त्वदन्यं न याचे – आपल्या शिवाय अन्य कोणालाही मी मागत नाही.
आता इतक्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या नंतर आपण मला कृपेचे दान देणार नाही तर कुणाला देणार?
भवद्भक्तिमेव स्थिरां देहि मह्यं- मला आपली स्थिर भक्तिप्रदान करा. भगवंताच्या चरणी नेमके काय मागायचे? हेच आचार्यश्री येथे सांगत आहेत. त्या चरणाशी व्यवहारातील सामान्य गोष्टी नव्हे तर भगवंताच्या भक्तीची मागणी हीच एकमेव योग्य मागणी आहे.
कृपाशील – हे कृपाशील अर्थात कृपा हा ज्यांचा स्वभाव आहे अशा भगवंता.
शंभो – हे कल्याणकारका !
आपण माझ्यावर अशी कृपा केली की,
कृतार्थोऽस्मि तस्मात- त्यामुळे मी कृतार्थ होईल. मग माझ्या आयुष्यात करण्यासारखे काहीही उरणार नाही. माझे जीवन सफल होईल.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply